रेल्वेविरोधात आंदोलन: दहा शिवसैनिकांची 12 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

सामना प्रतिनिधी । डोंबिवली

प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा जाब विचारण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकात आंदोलन करणाऱ्या दहा शिवसैनिकांची रेल्वे न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. जे. कळसकर यांनी तब्बल 12 वर्षांनी निर्दोष मुक्तता केली.

प्रवाशांना विविध प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी जानेवारी 2006 मध्ये शिवसेनेचे शिष्टमंडळ व प्रवासी निवेदन घेऊन रेल्वे स्टेशन मास्तरांना देण्यासाठी गेले होते. मात्र यावेळी तेथे उपस्थित असलेल्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना उर्मट उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिवसैनिकांनी या अधिकाऱ्याना काळे फासले.

या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी तत्कालीन नगरसेवक व रायगडचे विद्यमान संपर्कप्रमुख सदानंद थरवळ, शरद गंभीरराव, तात्यासाहेब माने, प्रभाकर चौधरी, गोविंद कुलकर्णी, सोपान पाटील, स्मिता बाबर, मनीषा धुरी, भावना चव्हाण व मधुमती शिसोदे आदी शिवसैनिकांना अटक केली. या प्रकरणी अॅड. जे. आर. प्रजापती यांनी शिवसैनिकांची बाजू मांडली.