
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात ईयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. संभाजीनगर विभागाचा निकाल 87.29 टक्के लागला असून गत वर्षाच्या तुलनेत निकालाचा टक्का घसरला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांत मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्ण विद्यार्थिनीचे प्रमाण 90.86 टक्के आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संभाजीनगर विभागाच्या सचिव सुगत्ता पुन्ने यांनी आज दुपारी 1 वाजता बारावी परीक्षाचा निकाल पत्रपरिषदेत जाहीर केला, यावेळी त्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी सहसचिव पाटील, शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण, जाधव आदींची उपस्थिती होती.
संभाजीनगर विभागांतर्गत फेब्रुवारी-मार्च-2019 मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी संभाजीनगर विभागांतर्गत संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांतून 1 लाख 62 हजार 646 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, 1 लाख 62 हजार 344 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 1 लाख 41 हजार 715 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 87.29 टक्के असून सर्वाधिक 89.22 टक्के निकाल संभाजीनगर जिल्ह्याचा लागला आहे. या जिल्ह्यातून 53 हजार 522 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांत मुलीच सरस
संभाजीनगर शिक्षण मंडळांतर्गत यंदा बारावीची परीक्षा दिलेल्या 1 लाख 62 हजार 646 विद्यार्थ्यांत 62 हजार 84 विद्यार्थिंनीचा समावेश होता. यापैकी 56 हजार 295 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून उत्तीर्ण विद्यार्थिंनीची टक्केवारी 90.86 आहे. मुलांचे उत्तीर्णांचे प्रमाण 85.09 टक्के आहे. पुर्नपरीक्षा दिलेले 2 हजार 36 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 33.76 आहे, असे यावेळी सांगण्यात आले. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा सर्वाधिक 94.44 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेचा 90.60, कला-78.83 एचएससी व्होकेशनलचा 78.72 टक्के निकला लागला आहे.
निकालाचा टक्का घसरला
बारावी परीक्षेच्या निकालात राज्याच्या तुलनेत संभाजीनगर विभाग चौथ्यास्थानावर असले तरीही विभागाची टक्केवारी यंदा घसरली आहे. गेल्या पाच वर्षांपासून घसरण सुरूच असून टक्का घसरण्याला कॉपीमुक्त धोरणाची प्रभावी अंमलबजावधी कारणीभूत असल्याचा दावा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. यंदाही शिक्षण मंडळाने महसूल, शिक्षण विभागाच्या मदतीने कॉपीमुक्त धोरण राबविण्यात आले होते. यासाठी बैठे पथक, फरारी पथक स्थापन करण्यात आले होते. त्यामुळे परीक्षेतील गैरप्रकारही चव्हाट्यावर आले. या परीक्षेत 373 गैरमार्गाचे प्रकरणे नोंदले गेले आहेत, याप्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे सचिव पुन्ने यांनी सांगितले.




























































