
सामना प्रतिनिधी । नांदेड
नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून, निवडणुकीच्या रिंगणात आता केवळ १४ उमेदवार उभे आहेत. निवडणूक दोन मतदान यंत्रावर घ्यावी लागते की काय, अशी चिंता प्रशासनाला होती. मात्र आज अनेक अपक्ष व विविध पक्षांच्या प्रमुखांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने प्रशासनाने सुस्कारा सोडला आहे.
नांदेड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ५९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी चार उमेदवाराचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. कालपर्यंत रिंगणात ५५ उमेदवार होते. काल सायंकाळी दहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात १४ उमेदवार उभे आहेत. उमेदवारांची संख्या जास्त झाल्याने दोन मतदान यंत्रे लागतात की काय, अशी शंका सर्वांना येऊ लागली होती. प्रशासन देखील त्यामुळे अस्वस्थ झाले होते. मात्र आज सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत ३१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता एकाच मतदान यंत्रावर ही निवडणूक होणार असल्याने प्रशासनाने सुस्कारा सोडला. एका मतदान यंत्रावर १५ उमेदवार आणि एक नोटाचे बटन असते. त्यामुळे आता ही निवडणूक एकाच मतदान यंत्रावर होणार आहे.
आज उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर युतीचे प्रतापराव पाटील चिखलीकर, विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे आणि सपा-बसपा आघाडीचे अब्दुल समद अब्दुल करीम यांच्यात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. येत्या १८ एप्रिल रोजी ही निवडणूक होणार आहे.




























































