
हिंदुस्थानच्या महिला संघाने संघर्षपूर्ण लढतीत बलाढय चीनचे आव्हान 3-2 फरकाने परतावून लावत बॅडमिंटन आशियाई सांघिक अजिंक्यपद स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. दुखापतीतून सावरलेली हिंदुस्थानची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने चार महिन्यांनंतर या स्पर्धेत विजयी पुनरागमन केले. याचबरोबर 17 वर्षीय पदार्पणवीरांगना अनमोल खरब हिने निर्णायक लढतीत आपल्याहून शेकडो स्थानाने पुढे असलेल्या चीनी खेळाडूचा पराभव करीत हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले, हे विशेष.
‘डब्ल्यू’ गटात दोनच संघ असल्यामुळे हिंदुस्थानने चिनी संघाचा पराभव करीत स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. गतवर्षी ‘प्रेंच ओपन’मध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे सिंधूला स्पर्धा सोडावी लागली होती. 11व्या मानांकित हिंदुस्थानच्या या खेळाडूने आठव्या मानांकित चीनच्या हेन युई हिचा 21-17, 21-15 असा अवघ्या 40 मिनिटांत पराभव करीत हिंदुस्थानला 1-0 आघाडी मिळवून दिली. त्यानंतर तनीषा क्रास्टो व अश्विनी पोनप्पा या हिंदुस्थानी जोडीला ल्यु शेंग शु व टेन निंग या चिनी जोडीकडून 19-21, 16-21 अशी हार पत्करावी लागली. त्यानंतर अस्मिता चालिहा हिलाही नवव्या मानांकित वँग झी यी हिने 21-13, 21-15 असे सहज हरविल्याने हिंदुस्थानी महिला संघ 1-2 असा पिछाडीवर पडला. त्यानंतर त्रिशा जॉली-गायत्री गोपीचंद या जोडीने ली जी जिंग-लुओ शु मिन या चिनी जोडीचा चुरशीच्या लढतीत 10-21, 21-18, 21-17 असा पराभव करीत हिंदुस्थानला 2-2 असे बरोबरीत आणले. त्यानंतर निर्णायक सामन्यात अनमोल खरबने पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात चीनच्या वू लियो यू हिचा संघर्षपूर्ण लढतीत 22-20, 14-21, 21-18 असा पाडाव करीत हिंदुस्थानला 3-2 असा विजय मिळवून दिला. हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अनमोलने एक तास 17 मिनिटांपर्यंत झुंज दिली.
































































