पुरुषाला आली मासिक पाळी, निसर्गाने केलेली गुंतागुंत डॉक्टरांनी दूर केली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहा पेक्षा जास्त बोटं, दोन शीर, चार पाय असलेली मुलं जन्माला आलेली आपण पाहिली आहेत. मात्र नुकतीच जेजे रुग्णालयात एक धक्कादायक केस समोर आली आहे. एका पुरुषाला चक्क महिला व पुरुष या दोघांचेही गुप्तांग असल्याचे समोर आले आहे. या तरुणाला मुख्य लिंग हे पुरुषाचे असले तरी त्याच्या शरीराच्या आतल्या भागात डाव्या बाजूला पूर्णपणे महिलेसारखे गुप्तांग होते. भायखळा येथील जेजे रुग्णालयात सदर तरुणावर शस्त्रक्रीया करण्यात आली असून त्याच्या शरीरातील महिलेचे अवयव काढून टाकण्यात आले आहेत.

19 वर्षाच्या या तरुणाला गेल्या दोन तीन वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. त्याच्या पालकांनी त्याला बऱ्याच डॉक्टरांना दाखवले मात्र त्याचा त्रास कमी होत नव्हता. त्यामुळे त्यांनी त्याला जेजे रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी सुरुवातीला त्याच्या काही चाचण्या व सीटी स्कॅन केले. त्या स्कॅनमध्ये डॉक्टरांना काहीतरी विचित्र आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांनी त्याचा एमआरआय करण्याचे ठरवले.

एमआरआय रिपोर्ट समोर आल्यानंतर डॉक्टरांना धक्काच बसला. या तरुणाच्या गुप्तांगाच्या भागात पुरुष व महिला अशा दोघांसारखीही संरचना होती. त्याला पुरुषाचेही गुप्तांग होते व महिलेचेही. शरीराच्या डाव्या बाजूला त्याला महिलेसारखे गर्भाशय, अंडाशय व फॅलोपियन ट्यूब होती. तो जेव्हा किशोरवयीन झाला तेव्हा त्याला मुलींसारखी मासिक पाळी देखील सुरू झाली. मात्र या तरुणाचे महिलेचे गुप्तांग हे शरीराच्या आत बंद असल्याने मासिक पाळीचे रक्त शरीराच्या आतच जमा राहिले व त्या रक्ताच्या गुठळ्या झाल्या. त्या गुठळ्या त्याच्या गर्भाशय व अंडाशयाजवळ जमा झाल्या होत्या व त्यामुळे त्याच्या पोटात दुखायचे.

जेजे मधील डॉक्टर वेंकट गिते यांनी त्यांच्यावर ही शस्त्रक्रीया केली. याबाबत डॉ गिते यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाला हेर्माफ्रोडीटीझम (Hermaphroditism) हा आजार असून तो अत्यंत दुर्मिळ आहे.