
कोरोनाच्या सावटाखाली देशभरात आज पंधरा लाखांवर विद्यार्थ्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) दिली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) ही परीक्षा घेतली होती. कोरोना संकटाचा विचार करून या परीक्षेसाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रात सुमारे दोन लाखांवर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
देशभरातील 3800 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. दुपारी 2 वाजता सुरू होणाऱ्य़ा या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सकाळी 11 वाजल्यापासूनच सुरू करण्यात आली. गर्दी टाळण्याबरोबरच सोशल डिस्टन्सिंगचे योग्य पालन व्हावे यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या वेळा देण्यात आल्या होत्या. तोंडाला मास्क लावूनच प्रवेश दिले गेले. त्यानंतर प्रत्येकाची थर्मल तपासणी केली गेली आणि हातावर सॅनिटायझर दिले गेले. तपासणी करणाऱ्य़ा कर्मचाऱ्य़ांनी पीपीई किट्स परिधान केले होते. आसन व्यवस्थेतही डिस्टन्सिंग पाळले गेले होते. परीक्षेचा पेपर लिहून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एक-एक करून आपल्या ओएमआर उत्तरपत्रिका आणि प्रवेशपत्र एका टेबलवर रांगेत ठेवून केंद्राबाहेर पडण्यास सांगण्यात आले.
लवकरच ‘आन्सर-की’ उपलब्ध होणार
अनेक राज्य सरकारांनी ‘नीट’ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतूक व्यवस्था विनामूल्य उपलब्ध केली होती. पश्चिम बंगालमध्ये परीक्षार्थींसाठी विशेष मेट्रो सोडण्यात आल्या होत्या. ‘नीट’ परीक्षा शांततेत पार पडली असून लवकरच विद्यार्थ्यांना ‘आन्सर की’ देण्यात येणार आहे. त्याद्वारे आपल्याला किती गुण मिळू शकतील याचा अंदाज विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या परीक्षेत आवश्यक कट-ऑफ मिळवणारे विद्यार्थी पुढील समुपदेशन राऊंडसाठी पात्र ठरतील.
सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त
‘नीट’ परीक्षा ऑनलाइन घेता आली असती तरी चांगले होते परंतु काहीच पर्याय नसल्याने पेन-पेपर पद्धतीने घेतली गेली. तेसुद्धा योग्यच झाले. नाही तर आणखी विलंब झाला, असता तर वर्ष वाया गेले असते अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. परीक्षा केंद्रावर येताना मनात भीती होती, परंतु परीक्षा केंद्रांवरील सुरक्षेची व्यवस्था चांगली होती असेही अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत परवानगी दिली गेल्याबद्दलही विद्यार्थ्यांनी सरकारचे आभार मानले.
मुंबईत परीक्षा केंद्रे अचानक बदलल्याने विद्यार्थी-पालकांची धावपळ
एनटीएने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता यावे यासाठी पुरेशी आसन व्यवस्था उपलब्ध व्हावी म्हणून काही परीक्षा केंद्रे अचानक बदलली होती. महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, नांदेड आणि नाशिकमधील परीक्षा केंद्रांमध्ये असा बदल करण्यात आला होता, परंतु त्याची माहिती विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी कमी वेळात मिळाल्याने त्यांची नाहक धावपळ झाली. मुंबईतील मरीन लाइन्स येथील निर्मला निकेतन कॉलेजचे केंद्र बदलून चुनाभट्टी येथील वसंतदादा पाटील कॉलेजमध्ये हलवले गेले. मात्र त्याचा पत्ता देताना ‘नवी मुंबई’ असा चुकीचा उल्लेख केला गेल्याने बऱ्य़ाच विद्यार्थ्यांना वेळेवर केंद्रात पोहोचता आले नाही. अनेक विद्यार्थ्यांची वेळ चुकल्याने त्यांना परीक्षेलाही बसता आले नसावे असे बोलले जात आहे. परीक्षा केंद्रे घरापासून लांब मिळणे तसेच केंद्रावर पोहोचवल्यानंतर बराच वेळ आत प्रवेश न देणे अशा तक्रारी काही ठिकाणी ऐकायला मिळाल्या.
पेपर गेला कठीण
‘नीट’चा पेपर कठीण गेल्याची प्रतिक्रिया परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. फिजिक्स आणि बायोलॉजी विषयाचे प्रश्न अवघड होते. फिजिक्सचे प्रश्न जास्त कठीण होते.



























































