हरिश्चंद्रगडावर 20 ट्रेकर्स अडकले, सुटका करण्याचे प्रयत्न सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ठाणे

कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी 20 जणांसोबत हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगसाठी गेले होते. तिथून दीड किलोमीटरवर असणाऱ्या कोकणकडा येथे 1000 फूट खाली हे ट्रेकर अडकले आहेत. या ट्रेकर्सना एनडीआरएफच्या मदतीने वाचविण्याचे प्रयत्न सुरू असून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण तहसीलदार आणि पोलीसांना यासंदर्भात समन्वय ठेऊन ट्रेकर्सची सुटका करण्याबाबत निर्देश दिले आहेत. अंधार पडल्याने अडकलेल्या 20 ट्रेकर्सना तेथेच रात्र काढावी लागणार आहे. याठिकाणी त्यांना थंडीचा सामना करावा लागेल. त्यांच्याकडे पुरेशी पांघरुणे नसल्याचे अडवाणी यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासन या ट्रेकर्सचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सातत्याने त्यांच्या तसेच नगर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. मुरबाड तहसीलदार आणि त्यांचे कर्मचारीही बचावाच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. डॉ अडवाणी यांच्यासोबत 5 महिला व 17 पुरुष आहेत. कोकणकडापासून खाली 800 फूटावर ते अडकून पडले आहेत. अंधार असल्याने त्यांना मार्ग सापडत नाही. त्यामुळे बचाव पथकाला त्यांचे नेमके ठिकाण पाठवण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे ग्रामीण पोलीस तसेच जुन्नर पोलीस यांनादेखील या घटनेविषयी कळविले आहे.