गेल्या चार वर्षात 20 हजार हिंदुस्थानींनी अमेरिकेकडे मागितला राजकीय आश्रय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

अमेरिकेने अवैध प्रवाशांबाबत जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2014 नंतर सुमारे 20 हजार हिंदुस्थानींनी अमेरिकेकडे राजकीय आश्रय मागितल्याचे उघड झाले आहे. अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी मंत्रालयाने नॉर्थ अमेरिकन पंजाबी असोशिएशनला (एनएपीए) याबाबतची माहिती दिली आहे. ही संस्था पंजाबमधून आलेल्या अवैध प्रवाशांबाबतची माहिती घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचे काम करते. चार वर्षात अमेरिकेकडे आश्रय मागणाऱ्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या कमी आहे.

2014 मध्ये 2,306 जणांनी अमेरिकेकडे आश्रय मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यात 146 महिला होत्या. तर 2015 मध्ये अर्ज करणाऱ्यांची संख्या 2,971 एवढी होती. त्यात 96 महिला होत्या. 2016 मध्ये 123 महिलांसह 4,088 जणांनी तर 2017 मध्ये 187 महिलांसह 3,656 जणांनी अमेरिकेकडे आश्रय मागण्यासाठी अर्ज केला होता. अमेरिकेकडे आश्रय मिळण्यासाठी हिंदुस्थानींसह अनेकजण प्रयत्न करतात. गेल्या काही वर्षात अमेरिकेकडे आश्रय मागणाऱ्या हिंदुस्थानींच्या संख्येतही वाढ झाली आहे. अनेकजण अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी मध्यस्थांना 25 ते 30 लाख रुपये देतात.