2017 च्या विश्वचषक स्पर्धेने हिंदुस्थानी महिला क्रिकेटचे महत्त्व वाढवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2017 च्या इंग्लंडमधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या हिंदुस्थानी महिला क्रिकेट जगतासाठी गेमचेंजर ठरल्या. या स्पर्धेत महिला टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली आणि देशातील महिला क्रिकेटचे नशीबच उजळून गेले. आम्हा महिला क्रिकेटपटूंना देशातील क्रिकेट शौकिनांच्या एक आगळे ग्लॅमर मिळवून देणारी ही स्पर्धा ठरली, असे मनोगत हिंदुस्थानची धडाकेबाज मुंबईकर फलंदाज पूनम राऊत हिने वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केले. 2017 च्या अंतिम लढतीतील पूनमची 85 धावांची खेळी संघाचा पराभव टाळू शकली नव्हती. पण हिंदुस्थानी महिला संघाच्या स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे देशातील महिला क्रिकेटला मात्र सुगीचे दिवस आले.

पूनम आपल्या मुलाखतीत म्हणाली, 2017 च्या महिला आयसीसी विश्वचषकात आम्ही हिंदुस्थानी महिला संघाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवत इतिहास घडवला. अंतिम फेरीतील आमची मजल आम्हाला मोठे ग्लॅमर मिळवून देण्यास उपयोगी ठरली. एरव्ही महिलांच्या क्रिकेट लढतींना फारसे महत्त्व न देणाऱया रेडिओ आणि टीव्ही चॅनेल्सनी हिंदुस्थानी महिला संघांच्या लढतींना प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी प्राधान्य दिले. त्यामुळे इंग्लंडमधील 2017 ची विश्वचषक स्पर्धा हिंदुस्थानी महिला क्रिकेटच्या उत्कर्षाचे शिखरच ठरले, अशी भावना पूनमने व्यक्त केली.

क्रिकेटपासून रोखणारे पालक मुलींना प्रोत्साहन देऊ लागले

इंग्लंडमधील महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील हिंदुस्थानी संघाच्या चमकदार कामगिरीनंतर हिंदुस्थानी पालकही प्रभावित झाले. पूर्वी क्रिकेट हा तुमचा नाही मुलांचा खेळ आहे, असे बजावून मुलींना क्रिकेट लढतींना न पाठवणारे पालक आता स्वतः मुलींना घेऊन मैदानात येतआहेत. समाजात मुलींनी क्रिकेट खेळू नये असा जो समज होता तो दूर होऊ लागला आहे. ही देशातील महिला क्रिकेटच्या उत्कर्षाची नांदीच म्हणावी लागेल, असेही मत पूनम राऊतने व्यक्त केले. महिला क्रिकेटला पुरस्कार देणाऱयांची संख्या वाढतेय ही आनंदाची बाब असल्याचेही पूनम म्हणाली.

देशातील मुलींमध्ये टॅलंटची कमतरता नाहीय

मुंबईच्या प्रभादेवीत बालपण काढणारी 32 वर्षीय पूनम राऊत आता कांदिवली, चारकोपची रहिवासी आहे. क्रिकेटवरील आपल्या निस्सीम निष्ठsमुळेच तिने हिंदुस्थानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळवून आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. हिंदुस्थानी मुलींमध्ये खेळाच्या टॅलंटची कमतरता मुळीच नाहीय. देशातील महिला क्रिकेटला आणखी मोठी कीर्ती मिळवून देण्याची धमक आपल्या महिला क्रिकेटरमध्ये नक्कीच आहे, असा विश्वास पूनमने व्यक्त केला आहे. देशात महिलांचे 4 ते 5 आयपीएल संघ निश्चितच तयार होऊ शकतील असाही पूनमच्या दावा आहे. पालकांनी आणि समाजाने मुलींमधील क्रिकेटच्या टॅलंटला उत्स्फूर्त असा पाठिंबा द्यायला हवा, असे आवाहनही टीम इंडियाची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू पूनमने शेवटी केले आहे.