2018 सर्वाधिक उष्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शैलेश माळोदे, [email protected]

दरवर्षी आपण उष्णतेचे तापमापक लावतो आणि वसुंधरा तापलेलीच आढळते… 2018 हे वर्ष सर्वाधिक उष्णतेचं आहे, असं म्हटलं जातंय… कशी कमी करता येईल भविष्यात ही तप्तता….

थंडी कुठे पळाली याची चर्चा सुरू असतानाच थंडीला सुरुवात झाली आणि त्याच वेळी बातमी आली ती 2018 हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष असल्याची. ही बातमी तशी नवी नाही. कारण गेली तीन वर्षे म्हणजे 2015, 2016 आणि 2017 हीदेखील आतापर्यंतची सर्वाधिक उष्ण वर्ष होतीच, किंबहुना 2001 पासूनचा विचार करता आतापर्यंतची 18 च्या अठरा वर्षांनी उष्ण वर्ष असल्याचे विक्रमच नोंदवले आहेत. त्यामुळे 2018 चे चौथे उष्ण वर्ष असल्याची जागतिक हवामान संघटनेच्या अहवालातील माहिती केवळ आपल्यासाठी New Normal म्हणजे नेहमीचीच म्हणायला हवी.

2018 पुरते बोलायचे झाल्यास वाढते तापमान आणि वणवे आणि विविध वादळे म्हणजे ‘पृथ्वी तापतेय’ अशी शास्त्रज्ञांनी वाजवलेली ‘धोक्याची घंटा.’ वास्तवात अशा अनिश्चित तप्त भविष्याची नांदी घेऊन आलेले वर्ष म्हणायला हरकत नाही. हवामान बदलविषयक cop परिषद सुरू असताना हवामान बदलाचे वास्तव स्वीकारणे आवश्यक ठरतंय, हेच या उष्ण वर्षाची खरी ‘रिऑलिटी’ आहे. कॅलिफोर्नियातील मोठी आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न, मका, गहू यासारख्या ‘स्टेपल’ धान्याच्या उत्पादनातील घट, स्वीडन आणि एल साल्वाडोर यासारख्या पूर्णपणे वेगळय़ा देशांना बुचकळय़ात टाकताना दिसत आहेत. युरोपात नदीचं पाणी अणुभट्टय़ांना गार ठेवण्यासाठी योग्य म्हणजे गार नसल्यामुळे ते बंद करण्याची वेळ येऊन ठेपलीय. चार खंडांमध्ये उष्णतेच्या लाटांचा प्रकोप मोठय़ा प्रमाणात झाल्यामुळे विद्युत वहन जाळी (ग्रिड्स) बंद पडली आणि अनेक मृत्यू जपानसारख्या देशात उष्णतेमुळे घडून आले. अति उष्णतेमुळे मृत्यूचे प्रमाण वाढेल याची ही नांदीच म्हणायला हवी. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात 2080 साली तापमान वाढीमुळे मृत्यूचे प्रमाण पाचपट होण्याची शक्यता आहे. जर अमेरिकेसारख्या श्रीमंत राष्ट्राची ही कथा तर फिलिपीन्स, हिंदुस्थान यांची स्थिती काय असेल याची कल्पनाच केलेली बरी.

डॉ. डॅनियल स्पेन या हवामान तज्ञाच्या मते ‘‘आपण यापूर्वी इतक्या उष्ण जगात राहत नव्हतो आणि ही स्थिती अजूनही नव्याने ‘नॉर्मल’ झालेली नाही. कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन, एअर कंडिशनिंग या बाबी एका दुष्टचक्रासारख्या आपल्याला सातत्यानं आव्हानात्मक ठरत राहतील. पॅरीस करारानुसार दोन वर्षांपूर्वीच पावर प्रतिबंध आणण्याचं ठरलं असलं तरी अमेरिकेसहित प्रमुख राष्ट्र प्रदूषणात अग्रणी राहत सर्वांना एक ‘फॉल्टी’ रोज मॉडेल देत आहेत.
हिंदुस्थानही यात मागे नाही. शेतकऱयांसाठी उष्णतेतही तग धरणारी बियाणे तयार व्हायला हवीत. याशिवाय मुख्य म्हणजे कचरा निर्माण करणारी, ऊर्जा मोठय़ा प्रमाणात न वापरता जगणं शक्य बनवणारी जीवनशैली अवलंबने अधिक महत्त्वाचं आहे. याचे प्रयत्न 2001 पासून सतत उष्ण वर्षाचा तथाकथित बहुमान प्रयत्न करण्यापासून आपल्याला आनंददायकरीत्या वंचित करतील तेव्हाच मानव जात भविष्यासाठी तयार असेल, अन्यथा दरवर्षी आकडेवारी उष्ण वर्ष जाहीर करत राहील आणि माध्यम याबाबत लेख आणि बातमी प्रकाशित करतील. पण हे चालेल केवळ माणूस जिवंत राहील तर… तेव्हा आतापासूनच नावीन्यपूर्ण उपाययोजना सर्वांनी मिळून करायला हवी अन्यथा आणखी 2019 नव्हे तर पुढील अनेक वर्षे सर्वाधिक उष्ण वर्षाचं बिरुद चिंतेच्या प्रतीकाच्या स्वरूपात मिरवतील.