
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
नव्या वर्षाचे स्वागत करतानाच 2019 हे वर्ष हिंदुस्थानच्या राजकीय पटलावर वादळी ठरणार आहे. नवीन वर्ष ‘इलेक्शन इअर’ असून लोकसभेबरोबरच महाराष्ट्रासह आठ राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. नवे वर्ष, नवे सरकार ठरविणारे 2019 असणार आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका या लोकसभेच्या ‘सेमीफायनल’ होत्या. या सेमीफायनलमध्ये भाजपला जोरदार झटका बसला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेसची सत्ता आली. या दारुण पराभवामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळणे कठीण आहे. भाजपचा मार्ग अत्यंत खडतर असल्याचा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून महाआघाडीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे 2019 मध्ये राजकीय लढाई देशपातळीवर पाहायला मिळेल. नवीन वर्ष, नवे सरकार कसे असेल याची उत्सुकता देशभर आहे. लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होईल असे तर्क मध्यंतरी लढविले जात होते. सध्या ही चर्चा मागे पडली आहे.
येथे होतील निवडणुका
17 व्या लोकसभेसाठी मुदतीत निवडणुका झाल्या तर एप्रिल-मे 2019 ला निवडणुका होतील. मार्चच्या अखेरीस आचारसंहिता लागू शकते.
महाराष्ट्र विधानसभेची मुदत ऑक्टोबर 2019 ला संपत आहे. हरयाणा विधानसभेसाठी ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे.
ओडिशा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या चार राज्यांत लोकसभेबरोबरच एप्रिल-मे 2019 मध्ये निवडणुका होतील.
झारखंड विधानसभेची मुदत नोव्हेंबर 2019 ला संपत आहे.
जम्मू-कश्मीरात सध्या राष्ट्रपती राजवट आहे. येथे लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
























































