रात्र सर्वांची आहे! 27 जानेवारीपासून मुंबई @ 24 तास

903

प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱया दिवसापासूनच मुंबई 24 तास सुरू राहणार आहे. नरीमन पॉइंट, बीकेसी, काळा घोडा, मिल कंपाउंड या भागांत  मॉल्स, दुकाने, हॉटेल्स, आस्थापने सुरू राहतील. मात्र या भागात सर्व सुविधा 24 तास मिळणार असल्या तरी पब, बारना परवानगी देण्यात आलेली नाही. याला नाइट लाइफ नव्हे, तर मुंबई 24 तास म्हणा, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले असून या निर्णयाला मंत्रिमंडळानेही हिरवा कंदील दिला आहे.

मुंबईत 27 जानेवारीपासून अनिवासी भागातील मॉल्स, हॉटेल्स आणि दुकाने रात्रीच्या वेळीही खुली राहणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली. या निर्णयामुळे पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही ताण पडणार नाही. उलट रोजगारनिर्मिती होणार आहे. मुंबईत रात्रीच्या वेळी कामावर असणाऱया तसेच पर्यटक आदींची यामुळे सोय होणार आहे. 2013 साली मुंबई महापालिकेत नाइट लाइफविषयी निर्णय घेण्यात आला होता. 2017 साली याबाबत राज्य सरकारने कायदा केला; मात्र केवळ काही कारणांमुळे याची अंमलबजावणी होत नव्हती. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार याची अंमलबजावणी सुरू करीत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

पुण्यात ‘आफ्टरनून लाइफ’चा विचार करतोय
नाइट लाइफ केवळ मुंबईतच सुरू होणार की पुण्यासारख्या इतर महानगरांतही सुरू होणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता आदित्य ठाकरे यांनी मिश्किल सुरात, पुण्यात ‘आफ्टरनून लाइफ’ सुरू करायचा विचार करतोय असे हसत हसत उत्तर दिले. पुण्यात दुपारी 1 ते 4 या वेळेत दुकाने बंद असतात यावर त्यांनी हा टोला लगावला.

केंद्र व भाजपच्या सर्व गोष्टी युवाविरोधी
भाजपकडून नाइट लाइफवर होणाऱया टीकेबद्दल विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, केंद्र सरकार असेल वा भाजपच्या सर्व गोष्टी या युवाविरोधीच आहेत. आधी नोटाबंदी केली. त्यामुळे रोजगार गेले. जामिया मिलिया असेल वा जेएनयू, येथेही काय झाले हे सगळय़ांनी पाहिले. त्यांना विद्यापीठांतदेखील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दिसतो. आमचा प्रयत्न रोजगार वाढीसाठी आहे. जे पब आणि बारची गोष्ट करतात त्यांनी आधी शासन निर्णय एकदा नीट वाचावा, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

बीकेसी, नरिमन पॉइंटमध्ये फूड ट्रक
एखाद्याला भूक लागली तर रात्री कितीही वाजता खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत. जर रात्रीच्या वेळी चित्रपट पाहायचा असेल तर तोदेखील पाहता येणार आहे. अनिवासी क्षेत्रात यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मिल कंपाउंड, बीकेसी, नरीमन पॉइंट इथे ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. बीकेसी व नरीमन पॉइंट येथील गल्ल्यांत फूड ट्रक उभे करता येणार आहेत. यात ध्वनिप्रदूषण असेल वा इतर कोणत्याही कायद्याचे जर संबंधितांनी उल्लंघन केले तर त्यांच्यावर कायमची बंदी घालण्याचे प्रावधानही कायद्यात असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

  • 10 लाख रोजगार
    मुंबईतील सर्व्हिस सेंटरमध्ये 5 लाख कर्मचारी काम करतात. 3 शिफ्टमध्ये काम सुरू झाल्यास 10 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे.  त्याचसोबत बस, टॅक्सी सर्व्हिस आदी क्षेत्रांतही रोजगार वाढणार आहे.
  • लंडन शहराची नाइट लाइफ इकॉनॉमी 5 बिलियन पाउंड इतकी आहे
  • कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही. उलट रात्री दीड वाजता दुकाने बंद झालीत की नाहीत हे पाहण्याचा पोलिसांचा त्रास वाचणार असल्याचे माजी पोलीस आयुक्तांनीच सांगितले आहे.
  •  एक्साइज विभागाचा काहीही सहभाग नाही. पब आणि बार चोवीस तास उघडे राहणार नाहीत. ते त्यांच्या दीड वाजताच्या पूर्वनियोजित वेळेलाच बंद होणार आहेत. त्या नियमात कोणताही बदल झालेला नाही.
आपली प्रतिक्रिया द्या