‘गारवा’ची पंचविशी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मंगेश दराडे

पाऊस गीतांचा विषय निघाला की, हमखास ओठांवर येणार एव्हरग्रीन गाणे म्हणजे ‘गारवा.’ कवी सौमित्र यांचे तरल शब्द, मिलिंद इंगळे यांचा सुमधूर स्वर आणि संगीत लाभलेला हा अल्बम आजही मराठी श्रोत्यांच्या मनमनांवर अधिराज्य गाजवतोय. येत्या 23 जुलै रोजी ‘गारवा’ या अल्बमला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत मिलिंद इंगळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

  • ‘गारवा’ला 25 वर्षे पूर्ण होतायत. इतक्या वर्षांनीदेखील या अल्बमची चर्चा होईल असे वाटले होते का? 

दरवर्षी पावसात प्रेक्षक ‘गारवा’ची गाणी आवडीने ऐकतात आणि जुन्या आठवणी  शेअर करतात तेव्हा खूप छान वाटते. मी नेहमी शब्दांना चाली लावतो, परंतु ‘गारवा’च्या बाबतीत उलट झाले. आधी मला चाल सुचली आणि त्यावर मी सौमित्रला गाणे, साजेशी कविता लिहायला सांगितली. ‘गारवा’ला रसिकांचे इतके प्रेम मिळेल, 20-25 वर्षांनीदेखील त्याची चर्चा होईल याचा आम्ही कधी विचार केला नव्हता.

  • ‘गारवा’च्या यशाचे गमक?

शब्द आणि चालीमधून भावना व्यक्त करणे हे मी गझलमुळे शिकलो. हळुवार, साधी, सोपी आणि सरळ गाणी ‘गारवा’च्या निमित्ताने आली अन् ती प्रेक्षकांनी उचलून धरली.

  • 1994 साली ‘गारवा’ अल्बम तयार होऊनदेखील रिलीजसाठी चार वर्षांची वाट का पहावी लागली?

 हा अल्बम रिलीज झाला तेव्हा कॅसेट्सचा जमाना होता. एकाच कॅसेटमध्ये वेगवेगळय़ा प्रकारची गाणी असायची. अशा वेळी पाऊस या एकाच विषयावर आधारित सात गाणी आणि त्याला साजेशा सात कविता असा वेगळा फॉरमॅट आणण्याचा आम्ही प्रयोग केला, आणला. त्या काळातील ट्रेंडला अनुसरून  अल्बम नसल्याने म्यूझिक कंपन्या  रिस्क घेण्यास तयार नव्हत्या. अखेर 1994 साली तयार झालेला हा अल्बम 1998 साली ‘राजश्री म्यूझिक’ने रिलीज केला.

  • ‘गारवा’च्या रेकार्ंडगवेळची एखादी आठवण सांगा…

सौमित्र म्हणजेच किशोर कदम त्या वेळी नाटकांच्या रिहर्सलमध्ये खूप बिझी असायचा. ‘गारवा’साठी मला एखादी चाल सुचल्यानंतर त्यावर गाणे लिहिण्यासाठी सौमित्रला अक्षरशः दीनानाथ कट्टय़ावरून शोधून आणायचो. एकदा तर मी त्याला किचनमध्ये कोंडून गाणे लिहायला लावले.  ‘गारवा’चे दुसरे कडवे त्याने चक्क टेकच्या वेळी लिहिले आहे. झाले असे की, वरळीच्या रेडिओवाणीत गाण्याचे रेकार्ंडग सुरू होते. रेकार्ंडग करताना मी त्याला विचारले, ‘‘अरे सौमित्र अख्खे गाणं रेकॉर्ड करायचे आहे. तू फक्त एकच कडवं तू लिहिले आहेस…दुसरे कडवे कुठेय?’’ त्यावर तो पटकन बाहेर गेला अन् कळकट्ट पायऱयांवर बसून घाईघाईने खिशातून लहानशी डायरी काढली आणि ‘गवतात गाणे झुलते कधीचे…हिरवे किनारे हिरव्या नदीचे’ हे सुंदर कडवे त्याने काही क्षणांत लिहिले.

  • त्याकाळी सोशल मीडिया नव्हता तरीही हा अल्बम लोकप्रिय कसा झाला?

हा अल्बम सर्वदूर पोहोचण्यात माऊथ पब्लिसिटीचा मोठा वाटा आहे. ‘‘अरे ‘गारवा’ची गाणी खूप छान आहेत तू ऐकलीस का?’’ असे रसिकांनी एकमेकांना सांगत गेल्यामुळे हा अल्बम सर्वांपर्यंत पोहोचला.   ‘गारवा’ला यश मिळण्यासाठी साधारण वर्षभराचा कालावधी लागला. पुढे गाण्याचा व्हिडीओ आल्यानंतर त्याची लोकप्रियता वाढत गेली.

  • सौमित्र व तुमची चांगली टय़ूनिंग असूनदेखील ‘गारवा’च्या यशानंतर तुम्ही फारशी एकत्र गाणी केली नाहीत?

म्यूझिक कंपन्यांचा पॅटर्न पूर्ण बदललाय.  म्यूझिक कंपन्या आता पूर्वीसारखा सात-आठ गाण्यांचा अल्बम तयार करत नाही. एक-एक गाणे तयार करून यूटय़ूबला टाकावे लागते. त्यामुळे नवीन अल्बम करणे कलाकारांसाठी  चॅलेंजिंग झालेय. आगामी काळात आम्ही दोघे  सात-आठ गझलांचा एक प्रोजेक्ट करतोय. त्यातील ‘पुन्हा ढग दाटून आले…’ या आमच्या नवीन गाण्याचा व्हिडीओ नुकताच यूटय़ूबवर आलाय. याशिवाय 23 जुलै रोजी आमचे एक नवीन पाऊस गीत तुमच्या भेटीला येईल.

  • ‘गारवा’च्या पंचविशीचे कशाप्रकारे सेलिब्रेशन करणार आहात?

‘गारवा’चे यश साजरे करण्यासाठी 23 जुलै रोजी रात्री 9 वाजता ‘गारवा हवाहवासा… उत्सव 25 वर्षांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात करण्यात आले आहे. ‘गारवा’ अल्बममधील गाणी आणि कविता लाइव्ह ऐकण्याची संधी  रसिकांना मिळणार आहे.