रात्रीची झोंबाझोंबी झाली, दुसऱ्या दिवशी प्रियकराचा मुलगा गायब झाला; नागपुरातील धक्कादायक घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रियकरासोबत रात्री शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर, 26 वर्षीय महिलेने तिच्या प्रियकराच्या 7 वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. रेश्मा भिवगडे असे या महिलेचे नाव असून ही घटना नागपूर येथे घडली आहे. शारीरिक संबंध ठेवल्यानंतर ती महिला प्रियकराच्या मुलाला बाहेर फिरण्यासाठी घेऊन गेली. मात्र तिला परत येण्याचा मार्ग सापडला नाही, म्हणून तिने मुलाला छिंदवाडा येथे तिच्या घरी नेले.

मात्र मुलगा दोन दिवस घरी न परतल्याने मुलाच्या वडिलांनी हरवल्याची तक्रार दाखल केली. अखेर 40 तासांच्या शोधानंतर, पोलिसांना तो मुलगा नागपुरातील शताब्दी चौकात त्या महिलेसोबत सापडला. याप्रकरणी रेश्मा भिवगडे या महिलेवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 7 वर्षीय मंथन वाघाडेसोबत निरंजन नगर येथून त्याचे वडील आकाश यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून भिवगडे ही महिला शनिवारी निघाली होती.

पोलीस सूत्रांनी सांगितले की, आकाश हा इसम त्याचा मुलगा मंथन याच्यासोबत एका बांधकामाच्या ठिकाणी राहत होता, तर त्याची पत्नी इतर दोन लहान मुलांसोबत दुसरीकडे राहत होती. आकाशची भिवगडे या महिलेशी शुक्रवारी चहाच्या टपरीवर मैत्री झाली होती. एका बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या पतीशी भांडण करून भिवगडेही आपल्या मुलासह घर सोडून निघून गेली होती.

शारीरिक संबंध ठेवल्यानंतर, ती महिला शनिवारी आकाशच्या घरून तिचा स्वतःचा मुलगा आणि आकाशचा मुलगा मंथन याच्यासोबत निघून गेली. ती लवकरच परत येईल असे समजून आकाशने तिला आपल्या मुलालाही घेऊन जाऊ दिले. त्यानंतर या महिलेला निरंजन नगर येथील आकाशच्या घराकडे परतण्याचा मार्ग आठवत नव्हता. ती महिला आणि प्रियकर यांच्याकडे मोबाईल फोन नव्हते, त्यामुळे ते एकमेकांशी संवाद साधू शकत नव्हते. त्यामुळे ती महिला मंथनला तिच्या मूळ गावी छिंदवाडा येथे घेऊन गेली.

याच दरम्यान, सोमवारी मंथनची आई आकाशला भेटायला आली आणि गेल्या दोन दिवसांपासून आपला मुलगा बेपत्ता असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. यानंतर त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. महिला आणि मुलाचा शोध घेण्यासाठी झोनल डीसीपी विजयकांत सागर यांनी पाच टीम तयार केल्या होत्या.

सूत्रांच्या माहितीनुसार महिलेने पोलिसांकडे जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलीस स्टेशन गाठू शकली नाही. मंगळवारी ती रेल्वेने नागपूरला परतली आणि ऑटोरिक्षाने शताब्दी चौकात गेली. यावेळी महिलेचा शोध घेत असलेल्या पोलिसांना मंथन रस्त्याच्या कडेला वाळूच्या ढिगाऱ्यावर खेळताना दिसला. यावेळी ती महिला त्या परिसरात होती. पोलिसांनी तात्काळ या महिलेला पकडले आणि मंथनला त्याच्या आई-वडिलांकडे सुखरूप सुपूर्द करण्यात आले.