अतिवृष्टीमुळे 14 हजार 480 नागरिकांचे स्थलांतर, राज्यभरात आतापर्यंत 110 नागरिकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या राज्यभरात पावसाने विश्रांती घेतली असली तरीही राज्यात 1 जुलैपासून आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टीचा फटका 28 जिल्ह्यांना बसला असून  आजतागायत 14 हजार 480 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे 110 नागरिकांनी  आपला जीव गमावला आहे. शिवाय या नैसर्गिक संकटात  218 प्राणी दगावले आहेत. 44 घरांचे पूर्णतः तर 2 हजार 86 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे.

रत्नागिरी  जिल्ह्यात सद्यस्थितीत पूरपरिस्थिती नाही, पण खबरदारीचा उपाय म्हणून जिह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्यात सध्याची पूरपरिस्थिती आटोक्यात आहे. जिह्यातील वैनगंगा नदी धोका पातळीच्या वर वाहत आहे. तसेच वर्धा, प्राणहिता आणि  इंद्रावती या नद्या इशारा पातळीच्या वर वाहत असून, नदीपात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.

चंद्रपूर जिह्यात सध्या पूरपरिस्थिती आटोक्यात आहे. वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत आहे. तसेच चंद्रपूर, वरोरा आणि  भद्रावती येथील नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येत आहे. आर्मी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे प्रत्येकी एक  पथक तैनात करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यात  पूरपरिस्थिती आटोक्यात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 110 महसूल मंडळापैकी 95 महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून  जिह्यात सध्या पूरपरिस्थिती आटोक्यात आहे.

राज्यात राष्ट्रीय आणि  राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 16 तुकडय़ा तैनात

मुंबई (कांजूरमार्ग 1, घाटकोपर 1)- 2, पालघर -1, रायगड- महाड-2, ठाणे-2, रत्नागिरी-चिपळूण-2, कोल्हापूर-2, सातारा-1, चंद्रपूर-1. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण 13 टीम तैनात आहेत. तर नांदेड-1, गडचिरोली-1, चंद्रपूर-1 अशा एकूण  तीन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) तुकडय़ा तैनात आहेत.