
सामना ऑनलाईन । मुंबई
पावसाळा काही दिवसांवर आल्यामुळे पालिकेकडून नालेसफाईचे काम जोरदार सुरू आहे. दरवर्षी 10 एप्रिलनंतर सुरू होणारी नालेसफाई या वर्षी 1 एप्रिलपासूनच सुरू झाली आहे. 31 मेपर्यंत ठेवलेल्या 70 टक्के कामाच्या उद्दिष्टापैकी 20 एप्रिलपर्यंत तब्बल 28 टक्के काम झाले आहे. 31 मेपर्यंत नालेसफाईचे काम पूर्ण करणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पावसाळ्यात मुंबईकरांना कोणत्याही गैरसोयींचा सामना करावा लागू नये यासाठी महापालिकेकडून नालेसफाई वर्षभर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर तीन टप्प्यांत वर्षभर नालेसफाई करण्यात येणार आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात 1 एप्रिल ते 31 मेपर्यंत 70 टक्के काम केले जाणार असून 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत या दुसऱ्या टप्प्यात 15 टक्के काम होणार असून 1 ऑक्टोबर ते 31 मार्च 2020 पर्यंत तिसऱ्या टप्प्यात उर्वरित 15 टक्के काम केले जाणार आहे. यानुसार पावसाळापूर्व 70 टक्के कामातील 20 टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
असे होते काम
दीड मीटरपेक्षा जास्त रुंद असणाऱ्या नाल्यांची सफाई पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून केली जाते तर दीड मीटरपेक्षा कमी रुंदी असलेल्या नाल्याच्या सफाईचे काम विभाग कार्यालयाकडून करण्यात येते.
रोबोटची ‘पॉवर’ वाढणार
शहरातील मोठय़ा नाल्यांच्या सफाईचे रोबोटच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर कामही सुरू झाले आहे. मात्र जुन्या नाल्यांमधील अनेक वर्षांपासून साठून राहिलेला गाळ, मोठे दगड यामुळे रोबोटच्या कामात अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर या रोबोटची तांत्रिक क्षमता वाढवण्यात येणार आहे.
विक्रोळी अपघाताची चौकशी सुरू
विक्रोळी येथे बुधवारी रात्री गटाराचे झाकण तुटून ट्रक उलटल्याने चार जणांना नाहक जीव गमवावा लागला. या प्रकरणी पर्जन्य
जलवाहिन्या विभागाच्या
पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. संबंधित घटनेची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे.
























































