
मध्य प्रदेशात पोलिसांनी पुन्हा एकदा नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशातील बालाघाट येथे सोमवारी सकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. पोलिसांनी नियोजनानुसार ही कारवाई घडवून आणली आहे. याबाबत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि राज्याचे गृहमंत्री डॉ.नरोत्तम मिश्रा यांनी पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे. या नक्षलवाद्यांवर 15 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत काही नक्षलवादी जखमी झाले आहेत.
बालाघाट जिल्ह्यातील कांडलाच्या जंगलात सोमवारी सकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली. बराच वेळ चाललेल्या या चकमकीत पोलिसांनी एक महिला आणि दोन पुरुष नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्या तीन नक्षलवाद्यांचे वय 35 ते 40 वर्षांच्या दरम्यान आहे. या नक्षलवाद्यांच्या डिव्हिजन कमांडरवर 15 लाख, एरिया कमांडरसाठी 8 लाख आणि महिला एरिया कमांडरसाठी 8 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. जीवावर खेळून नक्षलवाद्यांना ठार करणाऱ्या पोलिसांना आउट ऑफ टर्न प्रमोशन आणि शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे.
याविषयी पोलिसांनी सांगितले की, ही चकमकीची घटना बहेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. जंगलाभोवती नक्षलवाद्यांच्या हालचाली सुरू आहेत. या भागात पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक होत असते. अनेक दिवसांपासून पोलिसांची त्यांच्यावर नजर होती. संधी मिळताच पोलिसांना नक्षलवाद्यांच्या शोधासाठी जंगलात पाठवण्यात आले. या शोध मोहिमेदरम्यान तीन सशस्त्र नक्षलवादी जंगलात सापडले. ज्यामध्ये एक महिला नक्षलवादी देखील सामील होती. यावेळी पोलिसांना पाहून नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. मात्र पोलिसांना नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले.



























































