
सामना ऑनलाईन । मुंबई
केंद्र सरकारच्या वेगवेगळ्य़ा खात्यांमध्ये अधिकारी असल्याचे सांगून अनेकांना चुना लावणाऱ्या भामट्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मिलिंद लवाटे असे या भामट्याचे नाव असून खंडणीविरोधी पथकाने त्याला दिंडोशी येथून अटक केली. तसेच त्याच्याकडील सरकारी अधिकारी असल्याची बोगस ओळखपत्रं, खोटी लेटरहेडस्, गाडी आणि इतर बरेच साहित्य पोलिसांनी जप्त केलं होतं. त्यानंतर आता पोलिसांकडे त्याच्याविरोधात फसवणुकीच्या तब्बल ३० तक्रारी लोकांनी दाखल केल्या आहेत. तसेच त्याने मुंबईतील प्रख्यात गुंडेचा बिल्डरची देखील फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वसामान्यांमध्ये आपली एक वेगळी इमेज तयार केली की लोक सहज फसतात हे मिलिंद याला माहीत होते. त्यानुसार केंद्र सरकारच्या खात्यात अधिकारी असल्याचे सांगून मिलिंदने लोकांना गंडविण्याचा धंदा सुरू केला. अर्थसहाय्य मिळवून देतो, नोकरीला लावतो अशी विविध कारणे सांगून त्याने मुंबईतच नव्हे, तर देशभरात अनेकांना फसविल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी सोमवारी मुंबईत सापळा रचून मिलिंदला अटक केली.
लवाटे उद्योगपती, व्यावसायिक यांना फायनान्स मिळवून देण्याचे आमिष दाखवायचा. त्यानुसार, १०० किंवा २०० कोटींचे फायनान्स मिळवून देण्यासाठी सुरुवातीला त्याचे १ टक्के रक्कम तो खात्यात जमा करायला सांगत असे. अशाच प्रकारे लवाटे याने मुंबईतील प्रख्यात गुंडेचा बिल्डर्स आणि अरुणाचल प्रदेशमधील एका शाळेला लाखोंचा गंडा घातल्याच आता समोर आलं आहे. तसेच लवाटेने गुंडेचा बिल्डर्सची ६ कोटी रुपयांची तर शाळेची ४५ लाखांची फसवणूक केली आहे.
लवाटेने उद्योगपती, व्यावसायिक यांना फायनान्स मिळवून देण्यासाठी आदित्य या नावाने पाच वेगवेगळ्या कंपन्या सुरु केल्या होत्या. सरकारी अधिकारी आहे असे वाटावे यासाठी मिलिंदने त्याच कंपनींच्या नावाने अनेक पॉश कार घेतल्या होत्या. त्यावर ‘भारत सरकार’ लिहिले आहे. कोणालाही भेटण्यासाठी तो चालक आणि सोबत दोन ते तीन बॉडीगार्ड घेऊन जात असे. अशाच प्रकारे त्याने खोटी माहीती देऊन अनेक उद्योगपतींना कोटयावधीचा गंडा घातला आहे. लवाटे याच्या विरोधात मुंबई, पुणेसह दिल्ली, हरयाणा, गुरगाव या ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच आणखी किती लोकांची लवाटे याने फसवणूक केली आहे याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.




























































