डॉक्टरच्या घरातील 33 लाखांच्या चोरीचा छडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या माणिकनगरमधील डॉ. ऋषभ फिरोदिया यांच्या घरी झालेल्या चोरीची उकल करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. सफाईदारपणे केलेल्या तपासात 33 लाख रुपयांचे 55 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. कोतवाली पोलिसांनी केलेल्या कामाचे कौतुक करत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गुन्हा उघडकीस आणलेल्या टीमला 35 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.दीपक सर्जेराव पवार (वय 32, रा. मल्हारवाडी रोड, राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

डॉ. ऋषभ फिरोदिया यांच्या घरी 23 ते 28 ऑक्टोबरदरम्यान चोरी झाली होती. फिरोदिया यांच्या घरातून 55 तोळे सोन्याचे दागिने, हिरे, पुष्कराज, मोती आणि पाचू यांसह एक घडय़ाळ आणि 17 हजार रुपयांची रोकड चोरीला गेली होती. याबाबत डॉ. फिरोदिया यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पथकासह घटनास्थळाची 4 ते 5वेळा तपासणी केली. चोरांनी सफाईदारपणे चोरी केली होती, त्यामुळे तपासाचे आव्हान होते.

पोलीस पथकाकडून सातत्याने तपास सुरू होता. अनेक सीसीटीव्हींची तपासणी सुरू होती. यावेळी पोलिसांना तपासात महत्त्वपूर्ण धागेदोरे सापडले. यानंतर पथकाने तपासात वेग घेतला आणि राहुरीतील दीपक पवारभोवती सापळा आवळला. दीपक पवार याला राहुरी बसस्थानक परिसरातून कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी सुरू असताना, पवार दिशाभूल करत होता. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच, चोरीतील बरेच सोने घरी असून, काही सोने सेलू,परभणी येथील दोन सराफांना विकल्याचे त्याने सांगितले. कोतवाली पोलिसांनी परभणी येथील सराफ आणि दीपक याच्या घरातून सुमारे 33 लाख रुपयांचे हिरे व सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. दीपक पवार याला न्यायालयासमोर हजर केल्यावर त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, अश्विनी मोरे, तन्वीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदीप पितळे, ए. पी. इनामदार, सलीम शेख, अभय कदम, शाहीद शेख, अमोल गाडे, संदीप थोरात, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, लोणी पोलीस स्टेशनचे रवींद्र मेढे, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंड यांनी तपासात सहभाग घेतला.

दीडशे सीसीटीव्हींची तपासणी

दीपक पवार याने सराईतपणे चोरी केली होती. या चोरीची उकल करण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. तांत्रिक तपासात प्रारंभी धागेदोरे मिळत नव्हते. बारकाईने तपास सुरू असताना, 3 सेकंदांच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे दीपक पवारवर पोलिसांचा संशय बळावला. यासाठी कोतवाली पोलिसांनी नगर शहर, श्रीरामपूर, राहुरीतील 70 ठिकाणच्या सुमारे दीडशे सीसीटीव्ही कॅमेऱयांमधील चित्रीकरण तपासले. यानंतर दीपक पवारपर्यंत पोलीस पोहोचले. दीपक पवार कुत्रा विकत घेण्यासाठी आला असताना, कोतवाली पोलिसांनी त्याला राहुरी बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले.