नागपुरात 336 कुटुंब बेघर, रस्त्यावर साखरपुडा करण्याची नामुष्की; देवेंद्र फडणवीसांना आमंत्रण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2022 पर्यंत देशातील प्रत्येक गरिबाला स्वतःचे हक्काचे घर देणार असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. मात्र नागपूर मधील हिंगणा तालुक्यातील सातगाव मधील 336 कुटुंब बेघर झाली असून या कुटुंबांसमोर आता निवाऱ्याचा प्रश्न उभा राहिला आहे. गेल्या महिन्यात 24 एप्रिल रोजी पोलीस बंदोबस्तात सातगाव मधील या कुटुंबांच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला. त्या दिवसापासून हे कुटुंबीय नागपुरातील संविधान चौक येथे आंदोलन करत आहेत. प्रशासनाकडे अनेकदा पत्रव्यवहार करून देखील आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ते नागरिक करत आहेत. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आंदोलनस्थळी होणार साखरपुडा देवेंद्र फडणवीस यांना आग्रहाचे निमंत्रण

मंगळवार 2 एप्रिल रोजी या बेघर झालेल्या कुटुंबांपैकी एक असलेल्या सोनेवाल कुटुंबीयांच्या मुलीचा साखरपुडा आयोजित करण्यात आला आहे. मात्र हक्काचे घरच नसल्याने या कुटुंबीयांनी निषेध म्हणून आंदोलनस्थळी भर रस्त्यात साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या साखरपुड्यासाठी त्यांनी थेट पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केले आहे. निदान त्यानिमित्ताने तरी फडणवीस यांचे या आंदोलनकर्त्यांकडे लक्ष जाईल हा त्यामागचा हेतू आहे.

बेगर झालेल्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, “गेल्या पंधरा वर्षांपासून सरकारच्या जागेवर 336 कुटुंबांची घरे होती. त्या जागेवर नर्सरी उभारण्याचे नियोजित आहे असे सांगत या नागरिकांविरुद्ध न्यायालयात केस दाखल करण्यात आली. गेल्या महिन्यातील 19 तारखेला न्यायालयाचा निकाल आला व या जागेवरून नागरिकांना हटवण्यात यावं असं सांगण्यात आलं. नागरिकांनी त्या ठिकाणी पर्यायी जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली व त्या निर्णयावर स्थगिती मागितली. मात्र प्रशासनाने या विषयात लक्ष न घातल्याने गेल्या महिन्यातील 24 तारखेला या नागरिकांची गरज जमीनदोस्त करण्यात आली. ही सर्व कुटुंब गरीब असल्याने आता राहायचं कुठे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे आता हे नागरिक सरकारकडे पुनर्वसन करून देण्याची मागणी करत आहेत.”

“नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की 2022 पर्यंत प्रत्येक गरिबाला घर मिळणार मात्र सध्या या नागरिकांची आहेत ती घरं तोडण्यात आल्याने त्यांच्यापुढे निवाऱ्याचा प्रश्न उभा राहिला आहे. ज्या दिवसापासून या नागरिकांची घरं तुटली आहेत त्या दिवसापासून हे नागरिक संविधान चौक येथे आंदोलन करत आहेत. गेले महिनाभर नागरिक प्रशासनाला पत्रव्यवहार करत आहेत मात्र अद्यापही नागपूरच्या पालकमंत्र्यांनी नागरिकांना भेट दिलेली नाही.”

“सध्या अवकाळी पाऊस सुरू असल्याने नागरिक डोक्यावर ताडपत्री घेऊन येथे आंदोलन करत आहेत. 336 कुटुंब आपल्या लहान मुलांसहित आंदोलनाला बसले असून त्यांची कोणीच दखल घेत नाही. पोलीस देखील त्यांना पालकमंत्र्यांची भेट घालून देतो असे आश्वासन देत आहेत मात्र अद्यापही भेट झालेली नाही. नागपूरचे पालकमंत्री महाराष्ट्र दिनानिमित्त संविधान चौकाजवळ ध्वजारोहणासाठी आले होते. यावेळी पालकमंत्री आंदोलनकर्त्यांची भेट घेतो असे म्हणाले होते, मात्र आंदोलनकर्त्यांची भेट न घेता ते सरळ गडचिरोली येथे निघून गेले.”

“आंदोलनकर्त्यांपैकी एका मुलीचा मंगळवारी दोन तारखेला साखरपुडा आहे. आणि हा साखरपुडा आंदोलन स्थळी करण्यात येणार आहे प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे आज रस्त्यावर साखरपुडा करण्याची वेळ येथील एका कुटुंबाला आली आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत असे या आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या साखरपुड्याचे निमंत्रण नागपूरच्या पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कुटुंबाच्या वतीने देण्यात आले आहे.”