बेस्टमध्ये 2,200 कोरोनाग्रस्तांपैकी 1,975 उपचारानंतर बरे झाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
best-fin

बेस्टमध्ये आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्य़ांची संख्या आता 2,200पर्यंत पोहचली असून 1,975 जणांवर उपचार होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर बेस्टच्या आकडेवारीनूसार 35 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  बेस्टने लोकल सेवा बंद असताना कोरोना लॉकडाऊनमध्ये मुंबईकरांना सेवा दिली आहे. त्यामुळे बेस्टच्या ड्रायव्हर आणि कंडक्टर तसेच अन्य स्टाफला कोरोनाचा सामना करावा लागला आहे.

8 जूनपासून बेस्टचा प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे बेस्टच्या प्रवाशांची संख्या आता दररोज 16 लाख प्रवाशांपर्यंत पोहचली आहे. त्यातच बेस्टच्या फेऱ्य़ा 3,300 पर्यंत चालविण्यात येत असल्याने बसेसमध्ये पुरेसे ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखले जात नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचा आरोप कामगार संघटना करीत आहेत. कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झालेल्या 35 कर्मचाऱ्य़ांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी तसेच 50 लाख विमा नुकसान भरपाई देण्यात येत आहे.