आज राजकीय गटारी; भाजपकडे ‘कोंबड्या’वडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शुक्रवारपासून श्रावणमासी हर्ष मानसी असे सगळे शाकाहारी वातावरण सगळीकडे असेल. त्यामुळे सामिष भोजनभाऊ उद्या बुधवारी जोरदार गटारी साजरी करणार हे नक्की. घराघरात गटारीचा बेत आखला जात असतानाच राजकीय गटारीही दणक्यात साजरी होणार आहे. भाजपकडे ‘कोंबडय़ा’वडय़ाचा मेन्यू असून काँग्रेस-राष्ट्रवादीचे चार आमदार राजीनामा देऊन ही गटारी साजरी करण्यासाठी आज निघालेसुद्धा. बुधवारी रीतसर भाजप प्रवेश होईल आणि त्यांचा प्रवास राष्ट्रवादीतून राष्ट्रवादाकडे असा नोंदवला जाईल!

गेल्या काही वर्षांपासून गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली चाललेले राष्ट्रवादीचे तारू सपशेल डळमळीत झाले. लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजन विचारे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा विक्रमी मताधिक्य घेत पराभव केला. त्यात ऐरोलीमध्ये राष्ट्रवादीला 63 हजार 313 तर शिवसेनेला 1 लाख 7 हजार 676 मते तर बेलापुरात राष्ट्रवादीला 63 हजार 440 आणि शिवसेनेला 1 लाख 3 हजार 164 इतकी दणदणीत मते मिळाली. गणेश नाईक यांना हा मोठा हादराच होता. तेव्हापासूनच गणेश नाईक, त्यांचे पुत्र संदीप नाईक आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. पारसिक हिल येथील महापौर बंगल्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक झाली आणि त्यांनी पक्ष सोडण्यावर एकमताने शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात आले.

मंदा म्हात्रे आक्रमक
लोकसभा निवडणुकीत युतीच्या राजन विचारे यांना 85 हजार मतांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे विधानसभेसाठी भाजपला नाईकांची गरज नाही. म्हणून त्यांना पक्षात घेऊ नये असा आक्रमक पवित्रा भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी घेतला. त्यांची समजूत काढण्यासाठी राज्यमंत्री चव्हाण आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत हे म्हात्रे यांच्या निवासस्थानी तळ ठोकून होते.

गणेश नाईकांनी पक्षाची वाट लावली – आव्हाड
गणेश नाईक यांनी पक्षाची साफ वाट लावली आहे. नाईक हे पाच वर्षांत पक्ष साफ करतील आणि ऐनवेळी दुसऱया पक्षात उडी मारतील असे मी वारंवार सांगत होतो, परंतु पक्षानेच याकडे दुर्लक्ष केले. जी भीती मी व्यक्त केली तेच आता घडत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

नवी मुंबईत सगळी सत्तापदे त्यांनी आपल्या कुटुंबाकडे ठेवली. त्यांनी पक्षवाढीसाठी काहीही योगदान दिले नाही. राज्यात आघाडीची सत्ता होती तेव्हा कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदरमध्ये राष्ट्रवादी वाढली नाही. आता राष्ट्रवादीत जी फाटाफूट होईल त्यामागे गणेश नाईक यांचाच हात असेल असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

व्हाइट हाऊसमध्ये गणेश नाईक आलेच नाहीत
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अत्यंत विश्वासातील मानले जाणारे गणेश नाईक यांनी मात्र दोन दिवस यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आज सकाळी व्हाइट हाऊस निवासस्थानी सगळय़ांना भेटेन असे निरोप त्यांनी दिले. त्यामुळे राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती; परंतु गणेश नाईक यांच्यासह नाईक कुटुंबातील कोणीही कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी फिरकले नाहीत. या बैठकीपूर्वीच संदीप नाईक यांनी भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह थेट विधान भवन गाठले आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. इकडे दुपारपर्यंत व्हाइट हाऊसमध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरू होता. अखेर ते कंटाळून निघून गेले.

– लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली आहे. या दोन्ही पक्षांतील अनेक नेते महायुतीत सामील होत असून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तंबूत चिंतेचे वातावरण आहे. साताऱ्यात खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यातील वाद सर्वशुत आहे. दोघेही राष्ट्रवादीचे. दोघांमध्येही समेट घडविण्याचे अनेक प्रयत्न पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केले, पण ते अयशस्वी ठरले. शिवेंद्रराजे यांनी आज राजीनामा देण्यापूर्वी पवार यांनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्नही फसला. माझ्या मतदारसंघाचे रक्षण करण्यासाठीच राजीनामा देऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे शिवेंद्रराजे यांनी सांगितले.

आज गरवारेत
राजीनामा दिलेल्या चार आमदारांचा पक्षप्रवेश सोहळा बुधवारी सकाळी 11 वाजता चर्चगेटच्या गरवारे पॅव्हेलियनमध्ये होणार आहे.

– नवी मुंबईतही गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. लोकसभा निवडणुकीत मताधिक्य घटल्याने नाईकांचे तारू डळमळले आणि त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पुत्र संदीप यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून बुधवारी नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीच्या 52 नगरसेवकांसह अख्खे नाईक कुटुंब भाजप प्रवेश करणार असल्याचे समजते.

– मधुकरराव पिचड हे तसे शरद पवार यांच्या मर्जीतील नेते मानले जात होते, पण त्यांनीही पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी राष्ट्रवादी सोडणार असल्याची घोषणा करताच आज अकोल्यात त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून मधुकररावांचे पुत्र वैभव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. नायगावचे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपात जाणार अशी चर्चा गेले कित्येक दिवस सुरू होती, पण त्यांना राजीनाम्याचा मुहूर्त मिळत नव्हता. आज अखेर त्यांनी राजीनामा दिला. ते आता भाजपाई होतील.

– राष्ट्रवादीचे शिवेंद्रराजे भोसले (सातारा), वैभव पिचड (अकोला), संदीप नाईक (ऐरोली, नवी मुंबई) आणि काँग्रेसचे कालिदास कोळंबकर (नायगाव, मुंबई) या आमदारांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभाध्यक्षांकडे सुपूर्द केला. हे चारही आमदार बुधवारी भाजपात प्रवेश करतील असे सांगण्यात आले.