नगरमध्ये हॉटेल व ढाब्यांच्या तपासणीत सापडले ४३ वीजचोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

महावितरणच्या नगर ग्रामीण विभागात राबविण्यात आलेल्या हॉटेल व ढाब्यांचा विशेष तपासणी मोहिमेत ४३ ठिकाणी वीजचोरी आढळून आली. संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही व दंड ना भरणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्हाभरात व्यापक स्वरूपात व सातत्याने ही मोहीम राबविण्यात येणार असून रीतसर जोडणी घेऊन वीजवापर करण्याचे आवाहन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.

मुख्य अभियंता यांच्या सूचनेनुसार अधीक्षक अभियंता संतोष सांगळे व कार्यकारी अभियंता राजेंद्र साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली नगर ग्रामीण विभागांतर्गत नेवासा, पाथर्डी व शेवगाव तालुक्यात वीज चोरीविरुद्ध मोहीम उघडण्यात आली आहे. विषेशतः रस्त्यालगतचे हॉटेल, ढाबे याठिकाणी शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून घोडेगाव उपविभागात ११, नेवासे उपविभागात १६, पाथर्डी उपविभागात १२, शेवगाव उपविभागात ४ अशा एकूण ४३ ठिकाणच्या वीजचोर्‍या उघडकीस आल्या आहेत. नगर-औरंगाबाद महामार्गावरील पांढरीचा पूल ते प्रवरा संगम दरम्यानच्या सर्व हॉटेल, दुकाने यांची प्रामुख्याने तपासणी करण्यात येत आहे. घोडेगाव उपविभागात ११ तर नेवासे उपविभागात ९ हॉटेलमध्ये वीजचोरी आढळून आली आहे. या सर्वांविरुद्ध त्यांनी केलेल्या चोरीच्या विजेचे बिल तसेच दंडाचे देयक देण्यात येत आहे. ही रक्कम न भरणार्‍यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्याची गेल्या आर्थिक वर्षाची वीज वितरण हानी १८.३४ टक्क्यांवर पोहचली आहे. ही हानी कमी करण्यासाठी वीजचोरीला अटकाव करणे आवश्यक ठरले असून मुख्य अभियंता श्री. जनवीर यांनी जिल्हाभर व्यापक मोहीम राबवून वीज चोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश महावितरणच्या स्थानिक अधिकार्‍यांना दिले आहेत. या मोहिमेत सहकार्य करून वीजचोरांची माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.

या मोहिमेत उपकार्यकारी अभियंता विजय खताळ, रमेश पालवे, प्रतीक सरोदे, आदित्य पिंपळगावकर, आनंद किरपेकर, लक्ष्मी शिंदे, तंत्रज्ञ दिनेश ठाकरे, बाबासाहेब दहातोंडे, पल्लवी बाँबटकर, ज्ञानेश्‍वर सुरवसे, गोपीनाथ जाधव, सुनील खंडागळे, सोमनाथ टिक्कल, संभाजी व्यवहारे, करण मोकळ आदी सहभागी झाले.