45 हजार इमारतींमध्ये रेन हार्वेस्टिंग होतच नाही, पालिकेच्या आदेशांना केराची टोपली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

पालिकेचे आदेश असतानाही मुंबईतील तब्बल 45 हजारांवर इमारतींमध्ये रेन हार्वेस्टिंग होतच नसल्याचे समोर आले आहे. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नसल्यामुळे पाणी साचण्याचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी यापुढे सोसायट्यांना रेन हार्वेस्टिंग करणे बंधनकारक करून कठोर अंमलबजावणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 2002 साली नव्या इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याचे पालिकेने बंधनकारक केले. 2007 मध्ये या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली, मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे प्रत्यक्षात हजारो सोसायट्यांमध्ये रेन हार्वेस्टिंग होतच नसल्याचे समोर आले आहे.

300 स्क्वेअर मीटर व त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ असणाऱ्या जागेवर ही योजना राबवणे पालिकेने सक्तीचे केले, मात्र 2007 साली यात सुधारणा करून 500 स्क्वेअर मीटर व त्यापेक्षा अधिक जागेत ही योजना राबवण्याचा नियम करण्यात आला. यावेळी या योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या सोसायटय़ांना भोगवटा प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय झाला, मात्र प्रत्यक्षात या निर्णयाची कठोर अंमलबजावणी झाली नाही.