चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांची उद्या राज्यव्यापी निदर्शने, 29, 30 जानेवारीला संपाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सामना प्रतिनिधी । मुंबई

सातव्या वेतन आयोगाची मागणी मान्य झाली तरी रिक्त पदे भरण्याच्या प्रमुख मागणीसह, अनुकंपा तत्वावर कर्मचारी भरती करण्यात यावी व कंत्राटीकरणाला विरोध करण्यासाठी मंत्रालयासह सरकारी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी नवीन वर्षात 2 जानेवारीला राज्यव्यापी निदर्शने करणार आहेत. या आंदोलनामुळे प्रामुख्याने सरकारी रुग्णालयातील कामकाजावर परिणाम होण्याची भीती आहे.

राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास 29 व 30 जानेवारीला दोन दिवसांचा संप पुकारण्यात येणार आहे.

अनुकंपा तत्त्वावरील पदे रिक्त

सध्याच्या घडीला अनुकंपा तत्त्वावरील सुमारे 11 हजार 773 उमेदवार प्रतीक्षा यादीवर आहेत. अनुकंपा तत्त्वावरील पदे तत्काळ भरण्याची गरज आहे. कारण प्रतीक्षा यादीवरील उमेदवाराचे वय 45 पेक्षा अधिक झाल्यास त्याचे नाव प्रतीक्षा यादीवरून रद्द होते. याचा फटका असंख्य उमेदवारांना बसणार आहे. या अटीमुळे अनुकंपा तत्त्वावरील अनेक जण सरकारी नोकरीपासून वंचित राहतात.

40 टक्के रिक्त पदे

मंत्रालयापासून सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची 40 टक्के पदे रिक्त आहेत. रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांची पदे प्रामुख्याने रिक्त आहेत. सध्याच्या घडीला सुमारे 81 हजार पदे रिक्त आहेत.

तीन वर्षांत भरती नाही

चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांची मागील तीन वर्षांत भरती झालेली नाही. दरवर्षी सुमारे दहा टक्के चतुर्थश्रेणी कर्मचारी निवृत्त होतात. दुसरीकडे कंत्राटी पद्धतीने चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांची भरती सुरू आहे. मात्र याला संघटनेचा विरोध आहे.  

अन्यथा बेमुदत संप

चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांना दिले होते. पण मुख्य सचिवांनी यात लक्ष घातले नाही.  29 व 30 जानेवारीच्या संपानंतरही मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिला.