
आषाढी एकादशीनिमित्त राज्यासह देशभरातील लाखो वारकरी पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जातात. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून या वर्षी पाच हजार विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. 26 जून ते 5 जुलै या कालावधीत या गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी 27 जून रोजी 200 अतिरिक्त गाडय़ा चालवण्यात येणार आहेत.
सह्याद्री अतिथीगृह येथे आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. भाविकांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
गर्दी टाळण्यासाठी अतिरिक्त बस स्थानके
एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.
विभागवार जादा गाड्यांची व्यवस्था
छत्रपती संभाजीनगर 1200
मुंबई 500
नागपूर 100
पुणे 1200
नाशिक 1000
अमरावती 700

























































