
सामना प्रतिनिधी । लातूर
दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्याने गंगापूर गावातील सर्व लोक एकत्र आले आहेत. लातूरचे माजी जिल्हा उपनिंबधक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळमुक्त ग्राम योजना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी एका बैठकीतच 50 हजार रुपयांचा निधी ग्रामस्थांनी जमवला आहे.
सन २०१८-१९ या वर्षात संपूर्ण लातूर जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे. कमी पावसामुळे खरीप पिके व ऊसाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. तसेच, गावात रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत. परिणामी गावातील सर्वच शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. पुढील ५ ते ६ महिने सर्वाना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
दोनच वर्षांपूर्वी लातूर शहराला रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला, हे सर्वांना माहीत आहे. चालू वर्षी जैन संघटना व शासनाच्या वतीने गावातील सर्व नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. या कामावर सुमारे दोन कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्येक वर्षी आपणास अशी बाहेरून मदत मिळणार नाही. त्यासाठी गावाने दर वर्षी काही निधी उभारणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांना पटवून दिल्याने निधी जमा झाला आहे.
गंगापूर गावात सन २००३-०४ व २००४-०५ या वर्षात लोकसहभागातून पाणी अडविण्यासाठी अनेक कामे झाली आहेत. तसेच, सन २०१४-१५ मध्ये लोकसहभागातून जलकुंभ उभारण्यात आला आहे. तथापि, सतत येणारे अवर्षण व पाणीटंचाई विचारात घेता, गावातील लोकांनी दर वर्षी पाणी अडविणे व वृक्षारोपण या उपक्रमासाठी निधी उभारणी करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने व्यापक चर्चा होऊन बालाजी मंदिराच्या पारावर चौकात बैठक घेण्यात आली. त्यात एकाच दिवसात ५० हजार निधी गोळा करण्यात आला. गावातील सर्वानी एकत्र गावातच निधी गोळा करुन त्या निधीतून गावातच जलसंधारणाची काम करावीत असे ठरले. नवीन वर्षानिमित्त पहिल्याच दिवशी बैठक पार पडली व संकल्प करण्यात आला.
याप्रसंगी माजी जिल्हा परीषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, कृर्षी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हनुमंतराव खंदाडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुधाकर शिंदे, डॉ. सतीश कानडे, सरपंच बाबू खंदाडे, बच्चेसाहेब शिंदे, सुग्रीव वाघे, दगडू भेटेकर, दंडिमे गुरुजी, प्रवीण मूळे, उध्दव देशमाने, गोरोबा फुटाणे, आदी उपस्थित होते.






























































