
अमेरिकेची स्पेस एजन्सी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन (नासा), हिंदुस्थानी अंतराळ विज्ञान संघटन (इस्रो) आणि युरोपीय अंतराळ एजन्शी (ईएसए) मिळून स्पेश मिशन ऍक्सिओम 4 पुढील महिन्यात लाँच करणार आहे. या मिशनसाठी तब्बल 5 हजार 140 कोटी रुपये खर्च आला आहे. अमेरिकेची खासगी स्पेस कंपनी ऍक्सिओम स्पेसचे हे चौथे मिशन आहे. पहिले मिशन 17 दिवसाचे होते. जे 1 एप्रिल 2023 रोजी लाँच करण्यात आले होते. दुसरे मिशन 8 दिवसाचे होते. ते 2 मे 2023 रोजी लाँच केले होते. तर तिसरे मिशन 3 जानेवारी 2024 रोजी लाँच केले होते. ते 18 दिवसाचे होते. 2025 मधील चौथे मिशन हे 14 दिवसाचे असणार आहे. ऍक्सिकॉम 4 मिशनला एलॉन मस्क यांच्या स्पेक्सएक्स कंपनीच्या ड्रगन कॅप्सूलमध्ये लाँच केले जाईल. फाल्कन-9 रॉकेटहून ड्रगन कॅप्सूलमध्ये फ्लोरिडा येथील नासाच्या कॅनेडी स्पेस सेंटरहून हे मिशन लाँच केले जाईल.
हिंदुस्थानी वायू दलाचे ग्रुप कॅप्टन आणि अंतराळवीर शुभांशू शुक्लाच्या रुपाने चार दशकानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर पाठवण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. याआधी हिंदुस्थानच्या राकेश शर्माने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनचा दौरा केला होता. शुभांशू शुक्ला यांच्याकडे 2 हजार तासांहून अधिक अत्याधुनिक विमाने चालवण्याचा अनुभव आहे. यामध्ये सुखोई-30 एमकेआय, मिग 21, मिग 29, जॅग्कॉर, हॉक या विमानाचा समावेश आहे.
अंतराळ मिशनवर चौघे जाणार
हिंदुस्थानी वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे या मिशनचे पायलट असतील. ते पहिल्यांदा अंतराळात जात आहेत. पोलंडचे अंतराळवीर स्लावेज उज्नान्सकी हे या मिशनचे स्पेशलिस्ट असतील. हंगरीचे टिबोर कापू मिशनचे स्पेशलिस्ट असतील. अमेरिकेचे पैगी व्हिटसन यांच्याकडे मिशनची कमांड असेल.