
मुंबईत कोरोना नियंत्रणात असला आणि लसीकरण वेगाने सुरू असले तरी लसीकरण न झालेल्या व्यक्तींसाठी कोरोनाचा धोका कायम आहे. गेल्या सहा महिन्यांत एकही लस न घेतलेल्या दोन तृतीयांश लोकांना आयसीयूत भरती करावे लागले असून, त्यातील 93 टक्के म्हणजे 576 लोकांचा मृत्यू झाला आहे. गोरेगावच्या नेस्को कोरोना सेंटरमध्ये लस घेतलेल्या आणि न घेतलेल्या व्यक्तींच्या मृत्युच्या प्रमाणाबाबत केलेल्या विशेष अभ्यासात ही बाब उघड झाली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अहोरात्र मेहनत घेत असून, कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत आहे. मुंबईत आतापर्यंत 71 लाख 24 हजार 820 जणांनी पहिला डोस घेतला आहे, तर 28 लाख 50 हजार 588 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाचा वेग वाढला असला तरी आजही शारीरिक व्याधी तसेच 60 वर्षांवरील अनेकांनी विविध कारणांमुळे लस घेतलेली नाही. त्यामुळे अशा व्यक्तिंना कोरोना झाला तर रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या व्यक्तिंची प्रकृती ही अत्यंत चिंताजनक होते. त्यांना आयसीयूत दाखल करावे लागते. त्यामुळे मृत्युचे प्रमाण वाढते, असेही या निष्कर्षात म्हटले आहे.
1 मार्च ते 7 सप्टेंबरदरम्यान मृत्युचे प्रमाण
एकूण मृत्यु – 619
एक डोस घेतलेल्यांची संख्या – 37
दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या – 6
एकही डोस न घेतलेल्यांची संख्या – 576
मृत्युचे प्रमाण
एक लस घेतलेल्यांचे प्रमाण – 5.97
दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण – 0.96
दोन्ही डोस न घेतलेल्यांचे प्रमाण – 93.05





















































