उद्यापासून नवी मुंबईत राज्य अजिंक्यपद कॅरम

राज्यातील कॅरमपटूंचा कस लागणाऱ्या 59 व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचा थरार 10 मेपासून  वाशी येथे रंगणार आहे. या स्पर्धेत राज्यातील 550 पेक्षा अधिक पुरुष आणि महिला खेळाडू खेळत असल्याची माहिती नवी मुंबई स्पोर्टस् संघटनेचे सचिव विजय पाटील यांनी दिली.

वाशीमध्ये प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन होत असल्याने स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. या स्पर्धेत संदीप दिवे, योगेश परदेशी, प्रशांत मोरे या आजी-माजी विश्व विजेत्या खेळाडूंसहित जवळपास 50 पेक्षाही अधिक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व शिवछत्रपती पुरस्कारार्थी खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना 2 लाखांची रोख पारितोषिके, चषक व प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. तसेच या स्पर्धेत पुण्याच्या सागर वाघमारेला, तर ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकर यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.

 स्पर्धेतील मानांकन पुरुष एकेरी 1. सागर वाघमारे (पुणे), 2. महम्मद घुफ्रान (मुंबई), 3. पंकज पवार (ठाणे), 4. विकास धारिया (मुंबई), 5. अनिल मुंढे (पुणे), 6. प्रशांत मोरे (मुंबई), 7. संजय मांडे (मुंबई), 8. रिझवान शेख (मुंबई उपनगर).

महिला एकेरी 1. समृद्धी घाडीगावकर (ठाणे), 2. आकांक्षा कदम (रत्नागिरी), 3. प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), 4. मधुरा देवळे (ठाणे), 5. रिंकी कुमारी (मुंबई), 6. मिताली पाठक (मुंबई), 8. केशर निर्गुण (सिंधुदुर्ग).