पावसाची साठी, सर्वाधिक पाऊस दादर, बोरिवलीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

रविवारपासून सुरू झालेल्या पावसाने आज सलग तिसऱ्या दिवशीही मुंबईची पाठ सोडली नाही. हवामान खात्याचे अंदाज खरे ठरवत आज अखंड, अविरतपणे कोसळणाऱ्या पावसाने आत्ताच सरासरीची साठी पार केली. दिवसभर मिट्ट काळोख, सतत पडणारा पाऊस, त्यातच भरतीची वेळ यामुळे नोकरदारांनी धसका घेतला. त्यातच दुपारी १२ वाजता हवामान खात्याने २४ तास अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे सर्वच नोकरदारांच्या पोटात गोळा आला होता.

अफवांचा पाऊस

दरवर्षीप्रमाणे आजही सोशल मीडियावर अफवांचा पाऊस सुरू होता. चक्रीवादळाची शक्यता, वांद्रे-वरळी सी लिंक बंद केल्याचा मेसेज आज व्हायरल होत होता, मात्र ही अफवा असल्याचे नंतर पालिकेच्या आपत्कालीन विभागाने जाहीर केले.

साठ टक्के पाऊस

आज दिवसभरात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत हवामान खात्याच्या कुलाबा केंद्रावर ३९ मि.मी. तर सांताक्रुझ केंद्रावर १०६.२ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली. या पावसाळ्यात आतापर्यंत सुमारे १५०० मि.मी. पाऊस पडला आहे. वर्षभरात अडीच हजार मि.मी. पाऊस मुंबईत पडतो. त्यामुळे संपूर्ण वर्षभरात पडणाऱ्या पावसाच्या ६२ टक्के पाऊस जुलैच्या पहिल्या आठवड्यात पडला असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

सर्वाधिक पाऊस दादर, बोरिवलीत

सोमवारपासून कोसळणाऱ्या पावसाने दादर, गोरेगाव, बोरिवली, वरळी या भागाला सर्वाधिक झोडपून काढले. सोमवारी सकाळपासून ते आज दुपारपर्यंत पालिकेच्या पर्जन्यमापक यंत्रांवर नोंदवलेल्या पावसात ३०० मि.मी. ची सर्वाधिक नोंद झाली आहे.

मालाडमध्ये तलावात बुडून एकाचा मृत्यू

दोन दिवस सलग कोसळणाऱ्या पावसाने कुठेही जीवितहानी झालेली नसली तरी मालाडमध्ये तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. संतोष तुकाराम कांबळे असे त्याचे नाव असून तो ३५ वर्षांचा होता. मालाड पश्चिमेकडील साईनगर परिसरातील वॅनिला तलावात सोमवारी रात्री एकजण बुडाल्याची माहिती आपत्कालीन विभागाला मिळाली होती. आqग्नशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात पाठवले असता मृत घोषित करण्यात आले.

हवामान अंदाज

पुढील २४ तासांसाठी हवामान विभागाने शहर आणि उपनगरात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे.

६५०० कामगार अविरत रस्त्यावर

अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांचे हाल होऊ नयेत म्हणून पालिकेचे तब्बल ६५०० कर्मचारी अविरत रस्त्यावर पाण्यात उतरून कामे करीत आहेत.र्

हिंदमाता,किंग्ज सर्कल, वडाळा, शीव, अ‍ॅण्टॉप हिल, कुर्ला, बैलबाजार, गोरेगाव, वांद्रे, सांताक्रुझ, मिलन सबवे या ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी आल्यामुळे बेस्टची वाहतूक वळविण्यात आली, मात्र एवढ्या पावसातही बेस्टची सेवा सुरू ठेवण्यात आली होती.

डोंबिवलीच्या नांदिवली नाल्यात दोन तरुण बुडाले

डोंबिवलीच्या नांदिवली नाल्यात दोन तरुण वाहून गेल्याची घटना रात्री ८.३०च्या दरम्यान घडली. हर्षल जिमकल असे वाहून गेलेल्या एका तरुणाचे नाव असून तो गांधीनगर येथील रहिवाशी आहे. क्लासवरून परतत असताना तोल जाऊन तो नांदिवली नाल्यात पडला. यावेळी त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसरा तरुणही नाल्यात पडला. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.

  • एफ उत्तर: नायगाव, हिंदमाता   ३२२ मि.मी.
  • वडाळा – ३१९ मि.मी.
  • वरळी – ३०१ मि.मी.
  • प्रभादेवी – २९१ मि.मी.
  • बोरिवली – २९० मि.मी.

मुंबईत ४३ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना

शहरात १८, पूर्व उपनगरात ४ आणि पश्चिम उपनगरात २१ अशा ४३ ठिकाणी झाडे पडली. कांदिवलीत झाड पडून एक महिला जखमी झाली. चारकोप सेक्टर-४ मध्ये सारस्वत बँकेजवळ झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या पूजा पावसकर यांना जवळच्याच फिनिक्स या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.