कर्जातून खरेदी केलेली 70 एकर जमीन आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर अर्बन बँकेच्या एका कर्जदारास जमीनखरेदीसाठी दिलेल्या सुमारे तीन कोटींच्या कर्ज रकमेतून श्रीगोंदे तालुक्यात खरेदी केलेली सुमारे 70 एकर जमीन आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आली आहे. संबंधित जमिनीच्या खरेदी-विक्रीचे होणारे व्यवहार पाहून आर्थिक गुन्हे शाखेने तातडीने संबंधित शासकीय कार्यालयांशी पत्रव्यवहार करून जमिनीची माहिती मागितली आहे.

नगर अर्बन बँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने कर्जत येथील ठेवीदारांनी येत्या प्रजासत्ताकदिनी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

भाजपशी संबंधित असलेल्या बँकेच्या काही माजी पदाधिकाऱयांनी कर्जत व श्रीगोंदे तालुक्यांच्या काही भागातून महामार्ग जाणार असल्याने त्यावेळी जमिनीला किंमत येईल, या हिशेबाने श्रीगोंदे तालुक्यातील एका गावात सुमारे 70 एकर जमीन खरेदी करून ठेवली आहे. सत्ताधाऱयांशी संबंधित एका कर्जदाराला तीन कोटी कर्ज देऊन त्याच्या नावे ही जमीनखरेदी झाली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने बँकेच्या कर्ज खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू केले असून, त्याच्या तपासणीत या जमीनखरेदीसाठी बँकेतून पैसे वर्ग झाल्याचे समोर आल्याने पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. या संबंधित जमिनीच्या विक्रीचे होणारे व्यवहार व चर्चा पाहून तातडीने संबंधित शासकीय कार्यालयांशी पत्रव्यवहार केला आहे. जमिनीशी संबंधित संचालकांचीही चौकशी होणार आहे.

‘‘जमिनीच्या खरेदीखताविषयी संबंधित कार्यालयाकडे माहिती मागितली आहे. त्यांना पत्र पाठविले आहे. याबाबत अद्यापि आम्हाला माहिती मिळाली नाही. माहिती मिळाल्यानंतर याविषयी पुढील कार्यवाही केली जाईल.’’

– कमलाकर जाधव, पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा.