
राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी-2019-20) तब्बल 7880 अपात्र उमेदवारांना पात्र केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे. संबंधित अपात्र उमेदवारांच्या मूळ गुणामध्ये वाढ करून त्यांना पास करण्यात आले. त्यांच्याकडून प्रत्येकी दोन लाख ते अडीच लाख रुपये घेत एजंटापासून शिक्षण परिषद आयुक्तांपर्यंत साखळीने रक्कम वाटून घेत गैरव्यवहार केला. याप्रकरणी संबंधित अपात्र उमेदवारांची चौकशी होणार आहे. आतापर्यंत रोकड, दागिने असा ऐवज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून शिक्षक पात्रता परीक्षा 2019-20 मधील गैरव्यवहार प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात गैरव्यवहारातील शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण किभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख, माजी संचालक अश्विनी कुमार, शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह 30 ते 35 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांकडून टीईटी परीक्षा तपासात उमेदवारांच्या ‘ओएमआर शीट’ची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील तब्बल 7880 अपात्र उमेदवारांना पात्र ठरविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.




























































