आज लष्कर ध्वज दिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
>> आसावरी जोशी 
आज हिंदुस्थानी लष्कर ध्वज दिन. आपले सैनिक अहोरात्र देशाचे संरक्षण करीत असतात. सीमेवर तैनात असतात.. त्यांच्या गौरवाप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो..

 आपले हिंदुस्थानी लष्कर. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे महाबलाढ्य लष्कर. आज कोणत्याही क्षणी पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेण्याच्या तयारी असलेले आपले लष्कर आज लष्कर ध्वज दिन साजरा करतो आहे. आपले लष्कर म्हणजे आपला अभिमान आहे. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, संविधान दिन याप्रमाणेच हिंदुस्थानींसाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे भारतीय लष्कर ध्वज दिन. सेनेचं प्रतिक असणा-या ध्वजाचा सन्मान करण्यासाठी 7 डिसेंबर 1949 पासून हिंदुस्थानात ध्वज दिन दरवर्षी लष्कराकडून साजरा केला जातो.
म्हणून साजरा होतो लष्कर ध्वज दिन
देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी ध्वज दिन साजरा केला जातो. या दिवशी ध्वज खरेदीतून जमा होणारी रक्कम शहीद जवानांच्या आश्रितांच्या कल्याणासाठी खर्च केली जाते.ध्वज या प्रतिकाचा सन्मान करणं आपल्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे आणि भारतीय लष्कर म्हटलं की आपल्या समोर उभे राहतात ते भारतीय जवान आणि त्यांचे देशप्रेम. भारतीय जवानांची देशसेवा आणि जिवाची बाजी लावून देशाचं रक्षण करण्याची पराकाष्ठा. सेनेचे जवान आपल्या प्राणांची कुटुंबाची पर्वा न करता देशसेवा करतात. त्यांच्या या सेवेचे प्रतिक म्हणजे हा लष्कर ध्वज असतो.
 जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं 
तिरंगा ध्वज, लष्कर ध्वज अभिमानाने उंचावत असताना, देशभक्तीपर गाणी ऐकताना जवानांच्या बलिदानाची गाथा ऐकताना अभिमानाने उर भरुन येतो. डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. लष्करी जवानांचा सन्मान करणं, आणि त्यांच्या त्यागाचाही सन्मान करणं आपली जबाबदारी आहे. हिंदुस्थानी लष्कर ध्वज दिनानिमित्ताने हिंदुस्थानी जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यातून एकात्मतेचं बळं दृढ करणं महत्त्वाचं आहे.सशस्त्र सेना ध्वज दिनाची सुरुवात 7 डिसेंबर 1949 रोजी झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीने युद्धातील दिग्गज आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी 7 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन पाळण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून, सशस्त्र सेना ध्वज दिन दरवर्षी 7 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
सशस्त्र सैन्य ध्वज दिन का साजरा केला जातो?
सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त निधी उभारणीचे तीन मुख्य उद्दिष्टे आहेत – पहिले युद्धादरम्यान झालेल्या नुकसानीमध्ये मदत करणे, दुसरे म्हणजे सैन्यात सेवा करणाऱ्या लोकांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कल्याण आणि मदत. तिसरे सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करणे. या दिवशी हिंदुस्थानी लष्कर (Indian Army, हिंदुस्थानी वायुसेना (Indian Air Force) आणि हिंदुस्थानी नौदल (Indian Navy) विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. कार्यक्रमांतून जमा होणारा पैसा सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये जमा केला जातो.
संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय सैनिक मंडळाच्या स्थानिक शाखा या दिवशी पैसे संकलनाचे व्यवस्थापन करतात. त्यात व्यवस्थापन समिती आणि स्वयंसेवी संस्था असतात.
लाल आणि निळे झेंडे का दिले जातात?
लाल, गडद निळा आणि हलका निळा झेंडा देशभरातील सशस्त्र दलांसाठी जमा झालेल्या पैशाच्या बदल्यात दिला जातो. हे तीन रंग हिंदुस्थानी लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रतीक आहेत.
सीमेवर कठीण परिस्थितीत उभ्या असलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत, याचीही हा दिवस आठवण करून देतो.
राज्य शासनाच्या सैनिक कल्याण विभागामार्फत 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र दल ध्वजदिन म्हणून साजरा करण्यात येतो…
भारताने स्वातंत्र्य प्राप्त केल्यानंतर लगेचच सरकारला सैनिक कल्याणाचे योग्य व्यवस्थापन करण्याची गरज भासू लागली. त्यासाठीच 28 ऑगस्ट 1949 रोजी तत्कालीन संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने दरवर्षी 7 डिसेंबर हा ध्वजदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. यामागील संकल्पना अशी होती की, देशाच्या नागरिकांना सैनिकांचे स्मरण म्हणून एक छोटा ध्वज भेट द्यायचा आणि त्यांच्या बदल्यात नागरिकांकडून देणगी स्वीकारायची.
स्वातंत्र्यानंतर ध्वजदिनाचे औचित्य दिवसेंदिवस वाढत गेले आहे कारण देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचे व शहिदांच्या परिवारांचे पुनर्वसन व कल्याण यासाठी प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे. हे सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण यामध्ये नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव आणि सैनिकांच्या त्यागाबद्दल आदर असल्याची भावना व्यक्त केली जाते.
मूळ ध्वजदिन निधीची उभारणी संरक्षण मंत्रालयाच्या समितीद्वारे 1949 मध्ये करण्यात आली. 1993 मध्ये भारतीय संरक्षण मंत्रालयाद्वारे सैनिक कल्याणासंबंधी सर्व निधी सशस्त्र दल ध्वजदिन फंडामध्ये एकत्रित करण्यात आला.
हा निधी शासनातर्फे पुढील गोष्टींसाठी वापरला जातो
कल्याणकारी निधीच्या एकूण 44 प्रकारच्या योजनांसाठी आर्थिक मदत. या समितीचे अध्यक्ष माजी सैनिक कल्याण मंत्री असतात.
विशेष निधीमधून सैनिकी मुलां/मुलींचे वसतीगृहे व माजी सैनिक विश्रामगृहे माफक दरात चालविली जातात. या समितीचे अध्यक्ष मा. राज्यपाल असतात.
सशस्त्र सेना दल देशाचे रक्षण करण्यास सदैव सुसज्ज असते त्याचप्रमाणे नैसर्गिक तथा मानवनिर्मित आपत्तीच्यावेळी देखील बहुमोल कामगिरी करीत असते. भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले, अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे, यासाठी त्याचप्रमाणे युद्धात अपंगत्व आलेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो. माजी सैनिकांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ध्वजदिन निधीपैकी बहुतांशी रक्कम उपलब्ध करून दिली जाते.
शत्रूशी लढताना सैनिकांमध्ये जोश निर्माण करणारी  १२ स्फूर्तिदायी घोषवाक्ये
हिंदुस्थानी सेना हा देशाचा ताठ कणा आहे ज्याच्या भरवश्यावर आपला देश ताठ मानेने ह्या जगासमोर उभा आहे. आपल्या सीमांची रक्षा करणारे हे सेनेचे जवान आपल्या जीवाची परवा न करता अविरतपणे देशासाठी झटत असतात. एवढचं काय तर आपल्या कुटुंबीयांना दुय्यम ठेवत आपल्या मातृभूमीला आपल्या देशाला ते पहिलं स्थान देतात. त्यांचा केवळ एकच हेतू असतो तो म्हणजे देशाच्या शत्रूंपासून देशाचे रक्षण करणे.
भारतीय सेनेचे हे जवान नेहमी कर्तव्याची जाण ठेवत दिवसरात्र आपल्या देशाची देशाच्या नागरिकांची रक्षा करत असतात.
देशावर कुठलेही परकीय संकट आले की हे जवान त्यांच्यासमोर एक मजबूत भिंती प्रमाणे उभे राहतात. त्यांचा पराक्रम आणि शौर्य बघून प्रत्येक भारतीयाच्या मनात त्यांच्याबाबत आदर आणि देशाप्रती देशभक्ती निर्माण होते. सध्या आपल्या देशात १३ लाख सक्रिय सैनिक आहेत.
हे सर्व सैनिक वेगवेगळ्या रेजिमेंटमध्ये विभागलेले आहेत. आणि त्या सर्व रेजिमेंटची आपली वेगवेगळी एक ओळख आणि विशेषता आहे.
त्यापैकीच एक म्हणजे त्यांची ब्रीदवाक्ये.
 “हर हर महादेव”, “जय भवानी जय शिवाजी”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय …” ह्या घोषणा मराठा इनफंट्रीतील घोषणा आहेत. प्रत्येक मराठी सैनिकाला ह्या घोषणा कोणत्याही परिस्थितीत लढण्याचं बळ देतात.
 अशाच काही इतर घोषणा, ज्या विविध सैनिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत.
 १. भारतीय सेना : Service Before Self
  अर्थ : स्वतःच्या आधी सेवा. म्हणजेच तुम्ही तुमच्या देशाची मातृभूमीची रक्षा करायला किंवा सेवा करायला उभे आहात ते सर्वात पहिलं आणि महत्वाचं कर्तव्य आहे!
२. सैन्य हवाई संरक्षण : आकाशे शत्रून् जहि
 अर्थ : आकाशातच शत्रूला मारून टाका .
३. हिंदुस्थानी हवाई दल : नभस्पर्शं दीप्तम्
 अर्थ : आकाशाला स्पर्श करा. हे ब्रीदवाक्य आहे आपल्या वायुसेनेचं, आकाशात उंच उडणारी फायटर जेट्स आणि ते जीवावर उदार होऊन उडवणारे पायलट यांच मनोबल वाढवण्यासाठी हे वाक्य आहे! त्यांनी गगनात आणखीन उंच भरारी घेऊन, शत्रूला नेस्तनाबूत करून आपल्या देशाचे नाव आकाशात सुद्धा मोठे करावे हीच त्यामागची इच्छा!
४. भारतीय नौदल : शन्नो वरुण:
 अर्थ : समुद्र देवतेचा आशीर्वाद आम्हाला मिळत राहावा
५. तोफखाना विभाग पलटण : सर्वत्र इज्जत-ओ-इकबाल
 अर्थ : सर्वत्र गर्व आणि आदराने
६. रक्षक ब्रिगेड : पहला हमेशा पहला
 अर्थ : स्थिती कशीही असली तर आम्ही सर्वात पहिले तैनात राहू
७. मद्रास रेजिमेंट : स्वधर्मे निधनं श्रेय:
अर्थ : सेवा करताना जीव गमावणे अभिमानाची गोष्ट आहे.
८. गोरखा रेजिमेंट : कायर हुनु भन्दा मर्नु राम्रो
अर्थ : भित्राप्रमाणे जगण्यापेक्षा आदराने मरणे चांगले
९. राजपुताना रायफल्स : वीर भोग्य वसुंधरा
अर्थ : जो वीर आहे तोच ह्या धरतीवर राज्य करेल
१०. शीख रेजिमेंट : निश्चै कर अपनी जीत करों
अर्थ : दृढ संकल्पाने मी जिंकणार
११. डोगरा रेजिमेंट : कर्तव्यम अन्वात्मा
अर्थ : मरण्याआधी कर्तव्य
१२. जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री : बलिदानम वीर लक्षणम
अर्थ : त्याग हे वीरांचे लक्षण आहे.
 ही ब्रीदवाक्ये सैनिकांना कायम स्फूर्ती देत असतात.