
सामना प्रतिनिधी । मुंबई
माथेरानच्या पर्यटनाबरोबरच तेथील ग्रामस्थांच्या विकासाची गाडी रुळांवर आणणारी प्रसिद्ध ‘माथेरानची राणी’ आज शुक्रवार, 30 नोव्हेंबरपासून सहा ऐवजी आठ डबे घेऊन धावणार आहे. त्यासाठी पुढे आणि मागे इंजिन जोडण्यात येणार आहे. या आठ डब्यांद्वारे अमन लॉज ते माथेरान अशा शटल सेवेत आजपासून दररोज (8 अप आणि 8 डाऊन) 16 फेऱया चालविण्यात येणार आहेत.
माथेरानच्या मिनी ट्रेनला मे 2016 मध्ये रुळांवरून घसरून सलग दोन अपघात झाल्यानंतर बंद करण्यात आल्यामुळे माथेरानच्या विकासालाच खीळ बसली होती. रेल्वे मंत्रालयाने हा रेल्वे मार्ग प्रवाशांसाठी संपूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी 11 कोटी रुपये खर्च केले होते. त्यानंतर रूळ बदलून तीव्र वळणांवर आणि दरीशेजारी तटबंदी आणि कुंपण उभारण्याचे कामदेखील करण्यात आले होते. त्यानंतर 30 ऑक्टोबर 2017 रोजी ही ट्रेन पुन्हा सुरू करण्यात आली.
थेट नेरळ ते माथेरान तीन फेऱया होणार
नेरळ ते माथेरान या संपूर्ण पट्टय़ात सध्या सहा डब्यांची एक फेरी चालविण्यात येते. येत्या शनिवारी आणि रविवारी पर्यटकांच्या सोयीसाठी नेरळ ते माथेरान अशा दोन फेऱया चालविण्यात येणार आहेत. त्यानंतर येथे 5 डिसेंबरपासून सहा डब्यांच्या तीन फेऱया (3 डाऊन व 3 अप) चालविण्यात येणार आहेत.
आजपासून दररोज 16 शटल फेऱया
सध्या या ट्रेनची नेरळ ते माथेरान संपूर्ण 21 कि.मी.च्या पट्टय़ात एक फेरी चालविण्यात येते तर अमन लॉज ते माथेरान या 3 कि.मी.च्या पट्टय़ात विविध संख्येने फेऱया चालविण्यात येतात. आता येथे आठ डब्यांद्वारे दररोज अमन लॉज ते माथेरान अशा दररोज (8 अप आणि 8 डाऊन) अशा 16 शटल फेऱया चालविण्यात येणार आहेत.
असे असणार आठ डब्यांचे स्वरूप
आठ डब्यांमध्ये एक फर्स्ट क्लास, पाच सेकंड क्लास सीटिंग आणि दोन जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅन अशी गाडीची रचना असणार आहे. माथेरानच्या राणीसाठी वातानुकूलित डबा तयार केला असून त्याचे भाडे निश्चित होताच नेरळ ते माथेरान थेट सेवेसाठी वातानुकूलित डबाही जोडला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.



























































