
सामना प्रतिनिधी । नाशिक
नाशिक जिह्यातील कसमादे पट्टय़ातून आतापर्यंत 8 हजार 431 मेट्रिक टन इतक्या अर्ली सिजनच्या द्राक्षांची यूरोप खंडासह विविध देशांमध्ये निर्यात झाली आहे. यंदा प्रथमच ऑस्ट्रेलियाची बाजारपेठही आपल्या द्राक्षांसाठी खुली झाली आहे. हा करार झाला असला तरी तेथे निर्यातीला अजून प्रारंभ झालेला नाही.
देशात नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनात, तसेच निर्यातीतही आघाडीवर आहे. यंदा नाशिक जिह्यात सुमारे अडीच लाख एकर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. त्यापैकी सुमारे 50 हजार एकर क्षेत्र हे नाशिक जिह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यातील आहे. या चार तालुक्यांमध्ये द्राक्षाचा अर्ली सिजन असतो. ही द्राक्षे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत बाजारात येतात. हा हंगाम आता संपल्यात जमा आहे. कसमादेच्या द्राक्षांनीही आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे चांगलेच लक्ष केंद्रीत केले आहे. या पट्टय़ातून रशिया, दुबई, श्रीलंका, सौदी, थायलंड, चीन या देशात 7 हजार 735 मेट्रिक टन द्राक्ष पाठविण्यात आले आहेत, यूरोप खंडातील देशांमध्ये 696 मेट्रिक टन रवाना झाले आहेत, अशी माहिती कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव यांनी दिली.
59 हजार एकर क्षेत्राची नोंदणी
नाशिक जिह्यातील द्राक्ष उत्पादकांना आपल्या निर्यातक्षम द्राक्षबागांच्या नोंदणीचे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्यानुसार 15 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत 37 हजार 775 शेतकऱ्यांनी 59 हजार 755 एकर क्षेत्राची नोंदणी केली आहे.

































































