लोहा नगरपालिका निवडणुकीत 80 टक्के मतदान, सोमवारी मतमोजणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड 

लोहा नगरपालिका निवडणुकीसाठी आज जवळपास 80 टक्के मतदान झाले. यासाठी प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. थेट जनतेमधून नगराध्यक्ष पदाची निवड होणार असून, यासाठी चार जण निवडणूक रिंगणात होते. तर १७ नगरसेवक पदासाठी ५९ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. कोण निवडून येणार हे सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असून यानंतर लोहा नगरपालिकेतील चित्र स्पष्ट होणार आहे.

लोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून गजानन सूर्यवंशी, काँग्रेसकडून सोनू उर्फ व्यंकटेश संगेवार, बहुजन विस्थापित आघाडीकडून रमेश माळी तर अपक्ष म्हणून शिवाजी अंबेकर हे होते. तर १७ नगरसेवक पदासाठी ५९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

आज लोहा येथे २८ मतदान केंद्र होते. मतदार १८ हजार ६०० होते. यापैकी साडेपाच वाजेपर्यंत ८० टक्केच्या जवळपास मतदान झाल्याची माहिती हाती आली आहे. २८ केंद्रावर १२० कर्मचारी तैनात होते.

सोमवारी लोहा येथील तहसील कार्यालयात आठ टेबलवर मतमोजणी होणार असून, यासाठी २४ कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. तर एक पर्यवेक्षक आणि एक सहायक अशी याठिकाणी नेमणूक करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी टि.एस.बोरगावकर, सहायक निवडणुक निर्णय अधिकारी विठ्ठल परळीकर आणि अशोक मोकले यांनी दिली. सोमवारी साडेसातशे पोलीस बंदोबस्तात लोहा तहसीलमध्ये सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. बारा वाजेपर्यंत निकाल हाती येतील, असे सूत्राने सांगितले.