
85 वर्षाच्या एका नराधम म्हाताऱ्याने 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भुवनेश्वर येथे उघडकीस आली आहे. सदर मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. हा नराधम म्हातारा भुवनेश्वरमधील एका वरिष्ट सरकारी अधिकाऱ्याचा सासरा असून तो त्या अधिकाऱ्यासोबत सरकारी निवासस्थानात राहतो. याच निवासस्थानी हा प्रकार घडला आहे.
भुवनेश्वर महापालिकेत शैलाश्री विहार हे उपायुक्त पदावर गेल्या सहा महिन्यांपासून कार्यरत आहेत. पीडित मुलगी त्यांच्या घरी घरकामाचे काम करायची. त्यावेळी त्या अधिकाऱ्याच्या सासऱ्याने मुलीवर बलात्कार केला. तसेच त्या म्हाताऱ्याने मुलीला याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची देखील धमकी दिली होती. त्यामुळे मुलीने याबाबत कुणाला सांगितले नाही. मुलगी गरोदर राहिल्यानंतरही गप्प होती. मात्र जेव्हा पोट दिसू लागले तेव्हा तिच्या आईला संशय आला. तिने त्याबाबत विचारले असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने याप्रकाराची पोलिसांत तक्रार दिली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या नराधम म्हाताऱ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तर अधिकाऱ्या विरोधात अल्पवयीन मुलीला कामावर ठेवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्यांना अटक करण्यासाठी घरी पोहोचले असता दोघेही फरार झाले आहेत.


























































