
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडे तीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला होता. त्यानंतर राजधानी दिल्लीत चालत्या बसमध्ये 30 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला असतानाच राष्ट्रीय गुन्हा नोंदणी विभागाने (एनसीआरबी) भयावह आकडेवारी दिली असून देशात दिवसाला 86 बलात्कार होत असल्याचे उघड झाले आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशातील महिलांवरील अत्याचाराची स्थिती अत्यंत भयावह आहे. देशात गेल्या एका दशकाहून अधिक काळ दरवर्षी 30 हजारांहून जास्त बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद होत आहे. 2024 मध्ये देशात 29 हजार 536 बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती.
2021 च्या एनसीआरबीच्या अहवालानुसार, देशात वर्षभरात 31 हजार 677 गुन्हे नोंदवले गेले आहेत. याचाच अर्थ देशात दररोज सरासरी 86 बलात्काराच्या घटना घडत आहेत. 2016 मध्ये देशात सर्वाधिक म्हणजेच तब्बल 39 हजार बलात्काराचे गुन्हे दाखल झाले होते. 2018 मध्ये 33 हजार 356 गुन्हे नोंदवले गेले. याचा अर्थ दर 16 मिनिटाला एका स्त्रीवर अत्याचार होत असल्याचे दिसून आले.
तसेच या आकडेवारीतील सर्वात धक्कादायक आणि चिंताजनक वास्तव म्हणजे देशात होणाऱ्या एकूण बलात्कारांपैकी तब्बल 89 टक्के गुन्हे हे पीडित महिलेच्या ओळखीच्या व्यक्तींकडूनच केले जातात. यामध्ये पती, नातेवाईक, शेजारी आणि सोबत काम करणारे सहकारी यांचा समावेश आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
2018 ते 2022 दरम्यान देशात बलात्काराच्या खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचा दर केवळ 27 ते 28 टक्के इतकाच मर्यादित आहे. ब्रिटनमध्ये हे प्रमाण 60 टक्के पेक्षा जास्त आहे. तसेच 2017 ते 2022 दरम्यान न्यायालयांसमोर आलेल्या 2.76 लाख खटल्यांपैकी केवळ एक तृतीयांश खटल्यांचा निकाल लागू शकला. उर्वरित खटले वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. 2022 च्या युएन ह्युमन राईट्स कौन्सिलच्या अहवालानुसार, दलित महिलांच्या बाबतीत तर शिक्षेचे प्रमाण 2 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.



























































