‘इसिस’च्या संपर्कात असल्याचा संशय,मुंब्रा, संभाजीनगरातून नऊ तरुण ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

दहशतवादविरोधी पथकाने आज संभाजीनगर आणि मुंब्य्रामध्ये कारवाई करीत नऊ तरुणांना ताब्यात घेतले. ते नऊ तरुण गेल्या अनेक दिवसांपासून ‘एटीएस’च्या रडारवर होते. ते तरुण इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. त्या तरुणांची चौकशी सुरू असल्याचे ‘एटीएस’कडून सांगण्यात आले.

 ‘एटीएस’ पथकाने आज सकाळीच मुंब्य्राच्या कौसा अमृतनगर भागातून चार तरुणांना तर संभाजीनगरमधून पाच तरुणांना ताब्यात घेतले. हे तरुण इसिस संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती एटीएसकडे होती. त्यामुळे पोलिसांनी त्या नऊ तरुणांवर काही दिवसांपासून वॉच ठेवला होता. अखेर आज त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले, परंतु या कारवाईबाबत  ‘एटीएस’कडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मजहर शेख, मोहसिन शेख, सलमान शेख आणि फहाद खान अशी मुंब्य्राच्या अलमास कॉलनीतून ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली.