हवामान खात्याचा दुसरा ‘एक्झिट पोल’, देशात 96 टक्के, तर महाराष्ट्रात 100 टक्के पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना आनंद देणारा नैऋत्य मोसमी वाऱयांचा सुधारित अंदाज हवामान विभागाने शुक्रवारी जाहीर केला आहे. त्यानुसार या वर्षी देशात सर्वसाधारण म्हणजेच 96 टक्के, तर महाराष्ट्रासह मध्य हिंदुस्थानात 100 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे हा पाऊस शेती उत्पादनाला बळकटी देणारा ठरेल.

दरम्यान, मान्सूनने अरबी समुद्राच्या दक्षिण भागात असलेल्या मालदीव बेटे आणि लगतच्या कोमोरीन भागापर्यंत मजल मारली, तर बंगालच्या उपसागरावरील मान्सूनने वाटचाल करत संपूर्ण अंदमान बेटसमूहांचा भाग व्यापला आहे. पुढील तीन दिवसांत नैऋत्य मोसमी वाऱयांचा प्रवाह जोर धरण्याची शक्यता असून 6 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

विभागानुसार पावसाचा अंदाज
देशातील सुधारित पूर्वानुमानानुसार पावसाच्या अदांजात चार टक्के कमी-अधिक फरक गृहीत धरण्यात आला आहे. विभागनिहाय अंदाजाचा विचार करता मध्य हिंदुस्थानात 100 टक्के म्हणजे महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, गुजरात या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर वायव्य हिंदुस्थानात 94 टक्के, दक्षिण हिंदुस्थानात 99 टक्के तर पूर्व व ईशान्य हिंदुस्थानात 91 टक्के पावसाचा अंदाज आहे. यात आठ टक्के कमी-अधिक तफावत गृहीत धरण्यात आली आहे.