सिल्लोडच्या राजपूत हॉस्पिटलवर छापा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिल्लोड

बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी सिल्लोड येथील राजपूत हॉस्पिटलच्या डॉक्टर पती-पत्नीसह दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी सिल्लोड येथील राजपूत हॉस्पिटलवर पोलिसांनी छापा मारून चौकशी सुरू केली आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टराचे नाव गोविंद फुलचंद राजपूत व त्याची पत्नी अरुणा गोविंद राजपूत राहणार सिल्लोड. रघुनाथ शाहुबा गाडेकर (५५), भिकाबाई रघुनाथ गाडेकर (४५, रा. केळगाव, ता. सिल्लोड) असे गर्भपात केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

१० दिवसांपूर्वी आमठाणा परिसरात सात महिन्यांचे अर्भक सापडले होते. त्याचा धागा पकडून सिल्लोड पोलिसांनी केळगाव येथील दाम्पत्याला ताब्यात घेतले होते. वय जास्त असल्याने समाजात बदनामी होईल या भीतीपोटी व आधी ४ मुले असल्याने अपत्य नको होते म्हणून गर्भपात केल्याचे रघुनाथ शाहुबा गाडेकर, भिकाबाई रघुनाथ गाडेकर या दाम्पत्याने कबूल केले. तसेच पोलिसांनी अधिक चौकशी केली असता गर्भपात सिल्लोड येथील राजपूत हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी बुधवार, १३ रोजी राजपूत हॉस्पिटलवर छापा मारला. दाम्पत्याने ज्या ठिकाणी अर्भक पुरले होते त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला. सिल्लोड तालुक्यातील आमठाण हे गर्भपात करण्याचे मोठे केंद्र असून, या ठिकाणी खासगी रुग्णालयात तीस ते चाळीस हजार रुपये घेऊन गर्भपात केला जात असल्याचे तेथील नागरिक खासगीत सांगतात.

अर्भक सिल्लोडपासून लांब आणून टाकण्याचे कारण काय, खरच या रुग्णालयात गर्भपात झाला आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. अजून तपास सुरू असून, यात दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी दिली. पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हे करीत आहेत. या घटनेमुळे सिल्लोड शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.