
सामना प्रतिनिधी । कराड
कौटुंबिक वादातून पत्नी आणि आईवर चाकूने वार करून तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये रुग्णालयात नेत असताना पत्नीचा मृत्यू झाला, तर जखमी आई आणि युवकावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तळबीड पोलिसांनी युवकावर गुन्हा दाखल केला आहे.
मोहिनी सागर घोरपडे (वय ३२) असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. आई कल्पना सदाशिव घोरपडे (वय ५८) आणि हल्लेखोर सागर सदाशिव घोरपडे (वय ३६, तिघेही रा. वराडे, ता. कराड) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी संतोष प्रतापराव घाडगे यांनी तळबीड पोलिसांत फिर्याद दिली होती.
कराड तालुक्यातील वराडे या गावी सदाशिव घोरपडे कुटंबीयांसह राहतात. यामध्ये पत्नी कल्पना, मुलगा सागर, त्याची पत्नी मोहिनी आणि दोन मुले असे राहतात. सदाशिव यांचा दुसरा मुलगा अमित, त्याची पत्नी मोहिनी हे कामानिमित्त पुणे येथे राहतात.
शुक्रवारी (दि. २९) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सागरने पत्नी मोहिनी आणि आईवर चाकूने वार केले. त्यानंतर चाकू स्वतःच्या पोटात खुपसला. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. हल्ल्यानंतर आई आणि पत्नीने आरडाओरड केल्याने शेजारचे संतोष घाडगे यांनी तातडीने धाव घेतली. हल्ल्याची घटना समजताच संतोष आणि अन्य नागरिकांच्या साहाय्याने जखमी तिघांनाही एका जीपमधून रुणालयात नेले. वाटेतच पत्नी मोहिनी यांचा मृत्यू झाला. तर सागर आणि आई कल्पना यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी आईने दिलेल्या जबानीत सागरने आमच्यावर हल्ला करून स्वतःला भोकसून घेतल्याचे सांगितले. याप्रकरणी तळबीड पोलिसांनी सागर घोरपडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक वैशाली पाटील तपास करीत आहेत.




























































