
सामना प्रतिनिधी । मुंबई
अंधेरीत रेल्वेमार्गावर पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर दिवसभर विविध घडामोडींना वेग आला. रेल्वे प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड झाला. रेल्वेने केलेले स्ट्रक्चरल ऑडिट बोगस असल्याचे स्पष्ट झाले. हा पूल आधीच मोडकळीस आला होता. तरीही रेल्वे प्रशासनाने त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. परिणामी, हा पूल कोसळून पाच जण गंभीर जखमी झाले. सुदैवाने मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे मोठय़ा संख्येने विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली. त्यातच विरार रेल्वेस्थानकात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची आणि वाकोल्यात डबलडेकर बसला अपघात झाल्याची घटना घडली. एकीकडे मुसळधार पावसामुळे मुंबईची दैना उडवली, वाहतुकीचा खोळंबा झाला तर दुसरीकडे चाकरमानी कित्येक तास लोकलमध्येच अडकून पडले. या दुर्घटनेने मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अक्षरश: अंत पाहिला. अखेर त्यांच्या संतापाचा कडेलोट झाल्याने ट्विटरवर सरकारला शिव्यांची लाखोली वाहणारे आणि बुलेट ट्रेन नको आधी मुंबईची लाईफलाईन असलेली आहे तीच रेल्वेसेवा सुरक्षित करा असे सुनावणाऱ्या संदेशांचा पाऊस पडला. लोकलमध्ये अडकून पडलेल्या चाकरमान्यांच्या मदतीसाठी बेस्ट बसच्या जादा गाडय़ा सोडण्यात आल्या. अनेकांनी रेल्वे ट्रकवरून चालत इच्छित स्थळ गाठले तर अनेकांनी बेस्ट बसचा आधार घेत कार्यालये गाठली.
जबाबदारी रेल्वेची, मदत यंत्रणा पालिकेची
– रेल्वेच्या अखत्यारितील पुलाचा भाग कोसळल्यानंतर रेल्वेची यंत्रणा आणि अधिकारी दाखल होण्याआधीच पालिकेचे अधिकारी आणि यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती.
– पालिकेच्या आपत्कालीन विभागाला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन नियंत्रण कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष, १०८ रुग्णवाहिका, पश्चिम रेल्वे नियंत्रण कक्ष, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ), विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याशी समन्वय साधून मदत पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली.
– विविध ठिकाणी रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले.
– बेस्टने आज दिवसभरात १८३ जादा बेस्ट बसेस सोडल्या.
– के/पूर्व व के/प विभाग या पालिकेच्या विभाग कार्यालयातील २ उपायुक्त, २ सहाय्यक आयुक्त, १० कार्यकारी अभियंता, ३सहाय्यक अभियंता, १० कनिष्ठ अभियंता, ३ हायड्रा क्रेन, ६ जेसीबी, ५ डंपर्स, १० गॅस कटर्स, १० कॉक्रिट ब्रेकर्स, बांधकाम पाडणाऱया२ कंत्राटदारांची माणसे,२५० कामगार साधनसामग्रीसह घटनास्थळी उपस्थित होते.
– अग्निशमन दल या दुर्घटनेतील बचावकार्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठी कामगिरी बजावली आहे. १ उपप्रमुख अग्निशमन अधिकारी, १ विभागीय अग्निशमन अधिकारी, १ सहाय्यक अग्निशमन अधिकारी,४ फायर इंजिन, १ रुग्णवाहिका, १ रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी तैनात होती.
– एनडीआरएफचे १ पथक
– १०८ रुग्णवाहिका
– पालिकेच्या सात रुग्णवाहिका (अंधेरी – ५ व विलेपार्ले – ५) घटनास्थळी होत्या.



























































