पैसे वसुलीच्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

पैसे वसूलीच्या वादातून वायरी भागात राहणाऱ्या दिनेश दत्ताराम साळकर या तरुणावर रविवारी रात्री मालवण दांडी येथील शुभम संतोष जुवाटकर, राजेश खडपे याच्यासह अन्य एकाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यात संशयित आरोपी शुभम जुवाटकर याने दिनेश साळकर याच्या डोक्यावर बिअरच्या बाटलीचा प्रहार केला. जखमी अवस्थेत पळून जाणाऱ्या साळकर याच्यावर पिस्तुल रोखत जुवाटकर याने चाकूचे वार केले.
याबाबत शुभम संतोष जुवाटकर,राजेश खडपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण तालुक्यातील हडी साळकरवाडी गावचा रहिवाशी असणारा दिनेश साळकर हा व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबासमवेत वायरी गावकरवाडा येथे राहतो. दिनेश साळकर याची कोल्हापूर जिल्ह्यात वठार तालुक्यातील हातकनंगले याठिकाणी एक एकर जमीन असून या जमिनीच्या विक्रीसंदर्भात फेब्रुवारी २०१८ मध्ये तानाजी भंडारी (रा. वठार) यांच्याबरोबर करारपत्र झाले होते. मात्र या जमीन विक्री व्यवहारातील २ लाख रुपये रक्कम न मिळाल्याने दिनेश साळकर याने दांडी येथे राहणाऱ्या राजेश खडपे याच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यानंतर या रक्कमेच्या वसुलीकरिता राजेश खडपे याच्यातर्फे शुभम संतोष जुवाटकर (रा. दांडी मालवण) याने ही जबाबदारी घेतली होती.

रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास राजेश खडपे याने दिनेश साळकर याला फोन करून वायरी येथील हडकर बिअर शॉप जवळ बोलाविले. त्यानंतर दिनेश साळकर हडकर बिअर शॉपी मध्ये गेला असता त्याच्याकडे पाच बिअरची राजेश खडपे याने मागणी केली. यावेळी खडपे याच्यासोबत त्याचा सख्खा भाऊ लहान भाऊ तसेच शुभम संतोष जुवाटकर हे होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास बिअर पीत असतानाच यांच्यामध्ये काही कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून राजेश खडपे व त्याचा लहान भाऊ याने साळकर याला मारहाण केली व जुवाटकर याने जवळचे पिस्तुल काढून तानाजी भंडारी यांना दिलेल्या धमकीच्या बदल्यातील पैसे आता दे, नाहीतर याच पिस्तुलाने ठार मारून टाकेन अशी धमकी दिली. त्यानंतर जुवाटकर याने साळकरच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली.. या प्रकाराने भयभीत झालेला साळकर हा जीव घेऊन पळून जात असताना खडपे व त्याच्या भावाने पुन्हा साळकरला पकडले आ त्याच्यावर चाकूने हल्ला केला.

याबाबत दिनेश साळकर याने मालवण पोलिसात संशयित आरोपी शुभम जुवाटकर, राजेश खडपे आणि त्याचा भाऊ या तिघांविरोधात मालवण पोलिसांनी भादवि कलम ३२६, ५०६, २२५ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शुभम संतोष जुवाटकर राजेश खडपे या दोघांना अटक केली आहे.