
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
हवाई सुंदरी अनिशीया बत्रा हीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा नवरा मयांक सिंघवी याला अटक केली आहे. अनिशीयाने आत्महत्या करण्यापूर्वी मयांकला मेसेज पाठवला होता. अनिशीयाने त्याचा कंटाळून आत्महत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. यामुळे मयांकला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशीत समाधानकारक उत्तरं न दिल्याने मयांकला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दांपत्यामध्ये अनिशीयाच्या नावावर असलेल्या एका जागेच्या विक्रीवरून वाद झाले होते आणि या वादानंतरच अनिशीयाने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने मयांकला मेसेज पाठवला होता. हा मेसेज मिळताच मयांक गच्चीत गेला आणि त्याने तिला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तिने आत्महत्ये केली होती. अनिशीयाने तिच्या मैत्रिणीला काही दिवसांपूर्वी मेसेज पाठवला होता, ज्यात तिने म्हटलं होतं की ‘ तो मला मारून टाकेल, प्लीज पोलिसांना कळव, प्लीज मला मदत कर’ अनीशियाच्या आईवडीलांनी मयांकच्या आईवडीलांविरोधातही तक्रार नोंदवली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटलंय की मयांकचे आईवडील त्याचे कान भरायचे, ज्यामुळे त्याचे अनीशियासोबत सतत खटके उडत होते. मयांक एका चिनी कंपनीत उच्चपदावर काम करत होता. त्याचं हे दुसरं लग्न असून पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर मयांकचं अनीशियासोबत सूत जुळलं होतं.































































