दुसऱ्या दिवशीही दुध आंदोलनाची धग कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी दुध संकलन बंद आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यात या आंदोलनाची धग कायम असून स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मंगळवारी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकार्‍यांनी धाड व मलकापूर येथे आंदोलन केले.

बुलढाणा जिल्ह्यात स्वाभिमानीचे हे आंदोलन सुरूच असून मंगळवारी राणा चंद्रशेखर चंदन, शे. रफिक शे. करीम यांच्या नेतृत्वात धाड येथे आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता स्वाभिमानीचे पदाधिकारी व शेतकरी अशा ४० ते ५० च्या जमावाने धाड येथे संभाजीनगर रोडवर मराठवाड्यातून येणारी दुधाची गाडी अडवून गाडीतील दुधाच्या कॅन खाली उतरविल्या व नारेबाजी करीत रस्त्यावर दुध ओतून सरकारचा निषेध केला. एका खाजगी वाहनातून दुधाच्या कॅन कोणालाही न कळता अमर दुध डेअरीमध्ये येत असल्याची गुप्त माहिती स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने संभाजीनगर रोड गाठून हे वाहन अडविले.

यावेळी शेतकरी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर मोठ्या संख्येनी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेवून नंतर सोडून देण्यात आले. मलकापूर येथे स्वाभिमानीचे अमर राऊत यांच्या नेतृत्वात अकोल्याकडून बोदवडकडे जाणार्‍या दुधाच्या गाड्या अडविण्यात आल्या. या गाड्या रिकाम्या असल्या तरी त्या दुध आणण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाल्यावरून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गाड्यांच्या चाकातील हवा सोडून दिली. जिल्ह्यातील हे आंदोलन हिंसक वळन घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरून पोलिसांनी जिल्हाभरात बंदोबस्त वाढविला आहे.