दुधाची आणीबाणी, आंदोलनाचा भडका! पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

दुधाला पाच रुपये अनुदान मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या ‘दूध बंद’ आंदोलनाचा तिसऱया दिवशी भडका उडाला. दुधाची पंढरी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, नगरसह पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले असून कोल्हापुरात दानोळी येथे शेतकऱ्यांनी दुधाचा टँकर पेटवून दिला. तीक्र आंदोलनामुळे शहरांकडे जाणारा दूधपुरवठा रोखण्यात आला असून उद्या दुधाची आणीबाणी होणार हे निश्चित. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली असून ‘स्वाभिमानी’चे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी उद्या, १९ जुलैला जनावरांसह सहकुटुंब ‘चक्का जाम’ करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी उद्या बैठक घेण्याचे जाहीर केले आहे.

दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गेल्या तीन दिवसांपासून दूध आंदोलन सुरू आहे. आज ‘स्वाभिमानी’ने आंदोलन तीक्र केल्यामुळे सर्वच ठिकाणी दूधसंकलन बंद होते. कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी दूध वाहतूक करणारी वाहने अडवून दूध रस्त्यावर ओतून टाकणे, टँकर फोडणे, वाहने पेटवून देणे असे तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, सरकारने संघटनेच्या नेत्यांशी कोणतीही चर्चा न केल्याने आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा निर्णय खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केला आहे. त्यात पुणे-बंगळुरू हायवेवर किणीनजीक चक्काजाम करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दुधाचा टँकर पेटविला
मंगळवारी रात्री कोल्हापुरातील दानोळी फाटय़ानजीक स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर पेटवून शहराकडे जाणारे दूध रोखले. यावेळी कार्यकर्त्यांनी ड्रायव्हर केबिन आणि टायरवर रॉकेल ओतून टँकर पेटवून देण्यात आला. याप्रकरणी चालकाने फिर्याद दिली. तसेच अंकलीजवळ जमावाने टँकरच्या काचा फोडून नुकसान केले.

कार्यकर्त्यांची धरपकड, गुन्हे दाखल
अंकली टोलनाका ते तमदलगे बायपास रस्त्यावर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर पेटवून दिल्याप्रकरणी पोलिसांनी ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच गोकूळ शिरगाव येथे टँकरच्या काचा फोडल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हिंसक आंदोलन करणाऱयांवर कारवाई

दूध दरवाढीसाठी शांततेने आंदोलन करणाऱया शेतकऱयांवर गंभीर गुन्हे नोंदवले जाणार नाहीत. असे गुन्हे नोंदवले असतील तर ते मागे घेण्यात येतील, अशी ग्वाही देतानाच आंदोलकांकडून हिंसक प्रकार झाले असतील तर मात्र त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत स्पष्ट केले.

दुधाच्या प्रश्नासाठी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे लोण पसरत चालले असून पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरू केले आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. दुधाला रास्त भाव मिळावा म्हणून शेतकऱयांनी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे, मात्र त्यांना न्याय देण्याऐवजी सरकार त्यांच्यावर बळाचा वापर करते आहे. आंदोलनांमध्ये निदर्शकांवर साधारणतः १५१ (१) हे कलम लावले जाते, परंतु दूध आंदोलकांवर दरोडेखोर किंवा चोरांसाठी वापरली जाणारी कलमे लावली जात आहेत. हा प्रकार म्हणजे शेतकऱयांवरील दडपशाही असून सरकारने याबाबत तातडीने निवेदन करावे अशी मागणी विखे-पाटील यांनी केली.