
सामना प्रतिनिधी। पेण
पेण एज्युकेशन सोसायटीच्या वडखळ येथील जयकिसान विद्यामंदिरचे सहाय्यक शिक्षक प्रदीप देवीदास मुरूमकर यांना शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
मंगळवारी दुपारी २.०० च्या सुमारास ११ वर्षीय विद्यार्थीनी वर्गात एकटीच बसली होती. ती एकटी असल्याचे बघून मुरूमकर यांनी तिचा विनयभंग केला. याप्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने याबदद्ल पालकांना सांगितले. पालकांनी तात्काळ वडखळ पोलीस ठाण्यात धाव घेत मुरूमकर याच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्याच्यावर भा.द.वि.कमल ३५४ अ, बाल लैंगिक अत्याचार (पोस्को) अधिनियम २०१२ (एफ) (एम) १० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. या घटनेबाबत पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मंगेश नेने यांनी झालेला प्रकार योग्य नसल्याचे स्पष्ट केले. तसेच संस्था शिक्षकाला पाठीशी न घालता या प्रकरणी चौकशी करून त्याच्या विरोधात निंलबनाची कारवाई करेल असे सांगितले आहे.
























































