देवबाग-निवती समुद्रात अनोळखी मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

देवबाग संगम समुद्रात गुरुवारी सकाळी एक अनोळखी मृतदेह तरंगताना मच्छीमारांना दिसून आला. याबाबत मच्छीमार व पोलीस पाटील यांनी तात्काळ पोलिसांना माहीती दिली. मात्र तोपर्यंत मृतदेह लाटांच्या तडाख्याने निवतीच्या दिशेने वाहून गेला.

दरम्यान, याबाबतची माहिती मालवण पोलिसांनी निवती पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी निवती किनारा गाठत समुद्रात पाहणी केली असता एक मृतदेह तरंगताना दिसून आला. पोलिसांनी सायंकाळी ५. ३० वाजण्याच्या सुमारास मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला.

देवबाग संगम येथील समुद्रात गुरुवारी सकाळी एक मृतदेह तरंगताना स्थानिकांना दिसून आला. मात्र हा मृतदेह नेमका पुरुषाचा की महिलेचा हे समजू शकले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले असता त्यांना यश मिळाले नाही. दुपारी हा मृतदेह लाटांच्या तडाख्याने निवती येथील समुद्रात वाहून गेल्याची दिसून आल्यानंतर मालवण पोलिसांनी निवती पोलीस ठाण्यात मृतदेह वाहून येत असल्याबाबत कल्पना दिली.

निवतीच्या दिशेने मृतदेह वाहून येत असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी निवती किनारा गाठत समुद्रात पाहणी केली. त्यावेळी त्यांना लाटांबरोबर मृतदेह वाहून येत असल्याचे निदर्शनास आले. हा मृतदेह निवती किनारी सायंकाळी लागला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करत सदरील मृतदेह ४५ वर्षीय पुरुष जातीचा आहे, असे सांगितले. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती. निवती पोलिसांना मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यासाठीही वेळेत रुग्णवाहिका मिळाली नव्हती.